विजयाचा टप्पा बारा हजारांवर सीमित

1962 पासून शिरूर तालुक्‍यात कायम चुरस : आठवेळा अटीतटीची लढत

पुणे – 1962 ते 2014 या कालावधीत झालेल्या शिरूर विधानसभा निवडणुकीत कायम अटीतटीची लढत झाली आहे. जागरूक असलेला मतदारसंघ, पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष विचारांचा हा तालुका ओळखला जातो. या मतदारसंघात मतदारांनी आठवेळा सरासरी 7 हजार मतांनी उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ घातली आहे. त्यामुळे सजग असलेल्या मतदारांनी कायम निणार्यक कौल देत सत्ताधारी आणि विरोधकांना सतर्कतेने काम करण्यास भाग पाडले आहे. हे आतापर्यंतच्या निकालावरून दिसत आहे. शिरूरच्या राजकारणात बापूसाहेब थिटे, पोपटराव गावडे, बाबूराव पाचर्णे यांसह पवार कुटुंबीयातील रावसाहेब पवार/अशोक पवार यांना दोनवेळा संधी दिली आहे.

शिरूर तालुका हा औद्योगिकदृष्ट्या पुढारलेला म्हणून ओळखला जात आहे. पुणे शहराजवळ असलेल्या शिक्रापूर, रांजणगाव, कोरेगाव भीमा, सणसवाडी आदी गावांमुळे तालुक्‍यात औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागले. त्याचा सुप्त परिणाम तालुक्‍याच्या अर्थकारणावर झाला आहे. औद्योगिकीकरणापूर्वी शेती हाच व्यवसाय असलेला हा तालुका प्रगत आणि पुरोगामी विचारांचा होता. 1962पासून आतापर्यंत 12 विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. यात प्रत्येक निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी गटातील मतांचा फरक हा अटीतटीचा दिसून आला. 1962 मध्ये रावसाहेब पवार यांनी कॉंग्रेसकडून निवडणूक लढविली. यात प्रजा समाजवादी पक्षाचे शामकांत मोरे यांचा एक हजार मतांनी पराभव केला.

1967 मध्ये प्रजा समाजवादी पक्षाचे शामकांत मोरे यांनी तत्कालीन आमदार रावसाहेब पवार यांचा तीन हजार मतांनी पराभव केला. 1972 मध्ये कॉंग्रेसचे उमदेवार पोपटराव कोकरे यांनी आरपीआयचे रायकुमार गुजर यांचा 9 हजार मतांनी पराभव केला होता. 1978मध्ये आणीबाणीनंतरच्या काळात बाबूराव दौंडकर यांनी कॉंग्रेसच्या सूर्यकांत पलांडे यांचा 7 हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर दोनच वर्षांत पुन्हा झालेल्या निवडणुकीत सूर्यकांत पलांडे यांनी रसिकलाल धारिवाल यांचा 24 हजार मतांनी पराभव केला. 1985 मध्ये बापूसाहेब थिटे आणि रसिकलाल धारिवाल यांच्यात लढत झाली. त्यावेळी धारिवाल यांनी चांगलीच लढत दिली होती. मात्र, थिटे यांनी चार हजार मतांनी धारिवाल यांचा पराभव केला.

1990 मध्ये तत्कालीन आमदार थिटे यांनी जनता दलाचे संभाजी काकडे यांचा 10 हजार मतांनी पराभव केला. 1990 नंतर राज्यातील राजकीय वाऱ्यांची दिशा बदलू लागली. त्यात जिल्ह्यातील संदर्भ बदलले असताना 1995 मध्ये राज्यात सत्तांतर झाले होते. मात्र, शिरूर तालुका याला अपवाद राहिला. 1995 मध्ये कॉंग्रेसच्या पोपटराव गावडे यांनी बाबूराव पाचर्णे यांचा अवघ्या 897 मतांनी पराभव केला होता. ही मतांची विजयी आकडेवारी शिरूर विधानसभेच्या इतिहासात सर्वात कमी आहे. 1995 पासून पाचर्णे यांची राजकीय कारकिर्द बहरत गेली. 1999 मध्ये कॉंग्रेसमधून शरद पवार यांनी वेगळी चूल मांडून राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळी तत्कालीन आमदार गावडे यांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढविली. त्यावेळी पाचर्णे यांनी कॉंग्रेसमधून निवडणूक लढविली. दोन्ही कॉंग्रेस एकमेकांच्या विरोधात लढली. त्यावेळी गावडे यांनी पाचर्णे यांचा आठ हजार मतांनी पराभव केला.

1995पासून निवडणुकीचा आखाडा लढविणारे पाचर्णे यांनी 2004मध्ये भाजपकडून निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे गावडे यांचा 11 हजार मतांनी पराभव केला. दोनवेळा अपयश आल्यानंतर पाचर्णे यांच्या प्रयत्नाला 10 वर्षांनंतर यश आले.

थिटे, गावडे, पाचर्णेंचे दोनवेळा वर्चस्व
शिरूर तालुक्‍यात तत्कालीन आमदार बापूसाहेब थिटे यांनी 1985 व 1990 या दोन निवडणुकीत दोनवेळा प्रतिनिधीत्व केले आहे. त्यानंतर पोपटराव गावडे यांनी 1995 व 1999 मध्ये प्रतिनिधीत्व केले आहे. थिटे आणि गावडे यांना शिरूरकरांनी प्रत्येकी दोनवेळा पसंती दिली आहे. बाबूराव पाचर्णे यांनाही 2004 आणि 2014 मध्ये दोनवेळा संधी मिळाली. त्यामुळे जनमाणसांत रूळणाऱ्या लोकप्रतिनिधींना शिरूरकरांनी निर्णायक कौल दिला आहे. मात्र, मतांची टक्‍केवारी मर्यादित ठेवण्यावर भर दिल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

पवारांची दुसरी पिढी राजकारणात सक्रिय
शिरूर विधानसभा निवडणुकीत 1962 मध्ये तत्कालीन आमदार रावसाहेब पवार यांनी शिरूरचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यानंतर 2009मध्ये रावसाहेब पवार यांचे पुत्र अशोक पवार यांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढविली. त्यावेळी तत्कालीन आमदार बाबुराव पाचर्णे यांचा 7 हजार मतांनी पराभव करीत अशोक पवार यांनी विधानसभेत पहिले पाऊल टाकले. त्यामुळे पवार घराण्यातील दुसरी पिढी शिरूर तालुक्‍यातील राजकारणात चलनी नाणे म्हणून नावारूपास आली आहे. घोडगंगा साखर कारखाना, बाजार समिती, पंचायत समिती, ग्रामपंचायतींवर अशोक पवार यांच्या गटाची सत्ता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.