भोरमधून आमदार थोपटेंचा उमेदवारी अर्ज दाखल
भोर – स्वराज्य अडचणीत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना भोरच्या मावळ्यांनी साथ देऊन खिंड लढवली होती. येथील मातीचा उभ्या महाराष्ट्राला स्वाभिमान असून, कॉंग्रेसला ताकद देण्याचे काम माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी केले आहे. हेच काम आज त्यांचे पुत्र आमदार संग्राम थोपटे करीत आहेत, असे गौरवोद्गार कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
भोर विधानसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी मंगळवारी (दि. 1) उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्याकडे दाखल केला. त्यानंतर अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्रांगणात आयोजित मेळाव्यात थोरात बोलत होते. यावेळी माजी मंत्री अनंतराव थोपटे, माजी खासदार विदुरा नवले, अशोक मोहोळ, माजी जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी, सचिन साठे, कैलास गायकवाड, कौस्तुभ गुजर, श्रीरंग चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सीमा सावंत, नगराध्यक्षा निर्मला आवारे, स्वरुपा थोपटे, भोर तालुका महिलाध्यक्षा गीतांजली शेटे, जिल्हा परिषदेचे सदस्य विठ्ठल आवाळे, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाजी शिनगारे, तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, दिलीप बाठे, नितीन दामगुडे, महेश टापरे, सोपानराव म्हस्के, के. डी. सोनवणे, पोपटराव सुके, आनंदा आंबवले, दिनकर धरपाळे, संतोष साखरे, दादा मांडेकर, राजेश काळे आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, 1840 कोटी रुपयांचे कर्जमाफीचे गाजर दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करणारे आणि शिवस्मारकाचे कामात हजार कोटींचा भ्रष्टाचार सरकारने केला आहे. कोल्हापूर येथील पूरपरिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरले असल्याची टीका त्यांनी केली.
देशात आणि राज्यात कोणतीही लाट असली तरी भोर विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसचीच लाट आहे. येथे आऊटगोईंग नसून इनकमिंग सुरू आहे. या मातीशी इमान राखून असून, कॉंग्रेस सोडून कोठेही जाणार नसल्याचे सांगून दोन पंचवार्षिकमध्ये मी आमदार होतो आणि पुढेही मीच असेल.
– संग्राम थोपटे, आमदार भोर-वेल्हे-मुळशी