राहुरी – राहुरी तालुक्यातील केसापूर येथे तीन तर वांबोरी येथे एक असे एकूण चार पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी व टाकळीमियॉ येथे यापूर्वी प्रत्येकी एक असे दोन रूग्ण तालुक्यात आढळून आले होते. मात्र त्या रुग्णांवर उपचार होऊन ते पूर्णपणे बरे झाले आहेत. तेव्हापासून राहुरी तालुका करोनामुक्त होता. मात्र आज एकाच दिवशी चार पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज दुपारनंतर प्रशासनाने केसापूर व वांबोरी येथे धाव घेऊन दोन्ही गावे सील करण्यासाठी सुरूवात केली होती. आज वांबोरी येथे आढळून आलेला रूग्ण मुंबई येथून आलेला आहे. तसेच केसापूर येथील पती-पत्नी व त्यांचा मुलगा असे तिघेजण काही दिवसांपूर्वी मुंबई येथे गेले होते.
त्या ठिकाणी ते करोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात आले होते. ते तिघे राहुरी येथे आल्यानंतर त्यांना प्रशासनाने ताब्यात घेऊन तपासणी केली. त्यांचा अहवाल आज प्राप्त झाला असून एकाच कुटुंबातील ते तिघेजण करोनाबाधित असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. आज त्या तिघांच्या संपर्कात आलेले काहीजण ताब्यात घेतले आहेत.