लोणी काळभोर -हवेली तालुक्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून बुधवारी (दि. 1) दिवसभरात करोनाचे 25 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 25पैकी तब्बल 14 रुग्ण पूर्व हवेलीमधील लोणी काळभोर, मांजरी बुद्रुक, शेवाळेवाडी व कदमवाकवस्ती या चार ग्रामपंचायत हद्दीतील आहेत. तर हवेलीच्या पश्चिम पट्ट्यातील खानापूर ग्रामपंचायत हद्दीत एकाच दिवसात सात करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत.
हवेली तालुक्यात मागील सात दिवसातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 187वर पोचली आहे. तर बुधवारी दिवसभरात आठ करोना बाधीत रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले असल्याची माहिती हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी दिली.
डॉ. सचिन खरात म्हणाले, संपूर्ण तालुक्याचा विचार केल्यास, लोणी काळभोर, उरुळी कांचन, कुंजीरवाडी, मांजरी बुद्रुक, खानापुर, कदमवाकवस्ती, शेवाळेवाडी या प्रमुख ग्रामपंचायत हद्दीत रुग्ण वाढीचा वेग जादा आहे. प्रशासनाकडून हवेलीतील रुग्ण संख्या कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केलेले आहेत.
पूर्व हवेलीत रुग्णसंख्या धोक्याच्या पातळीवर…
लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन व थेऊर या प्रमुख चार ग्रामपंचायत हद्दीतील सात दिवसांतील रुग्णांची संख्या तीसवर पोचली आहे. मांजरी बुद्रुक व शेवाळेवाडी या दोन ग्रामपंचायत हद्दीत दोन दिवसांपूर्वीच रुग्ण संख्या पन्नाशी पार केली आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचा स्वॅब तपासणी करण्याचे आरोग्य विभागाने दिले असले तरी, स्वॅबची तपासणी करण्यासाठी वापरण्यात येणारे किट मिळत नसल्याने कमी तपासणी होत आहे.