मुंबई : शरद पवारांचे निकटवर्तीय माजी आमदार युनूस शेख यांचे निधन झाले आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने सोलापुरातील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. युनूस शेख कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती माजी महापौर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहर सपाटे यांनी दिली. आज सकाळी 11.30 च्या सुमारास उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दोन दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे एका खासगी रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांची करोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. वृद्धत्व, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यामुळे उपचाराला प्रतिसाद मिळू शकला नाही. अखेर रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
1969,1975 आणि 1985 साली तीन वेळा ते सोलापूर महापालिकेचे नगरसेवक होते. 1975 शरद पवार सोलापूरचे पालकमंत्री असताना युनूस भाई शेख यांना त्यांनी निवडून आणून महापौर केले. स्थायी समितीचे सभापती म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. शहरातील शरद पवार यांच्या राजकारणाची सूत्रे एकेकाळी त्यांनीच हाताळली होती. विशेषतः महापालिकेचा कारभार त्यांच्याच हाती एकवटला होता. १९९२ साली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांना विधान परिषदेवर बिनविरोध निवडून पाठविण्यात आले होते. मात्र दुसऱ्यांदा १९९७ साली त्यांना पराभव पत्करावा लागला होता. अखेरपर्यंत त्यांची शरद पवार यांच्यावर निष्ठा कायम होती.