हे करायला सोपे असे दंड स्थितीतील आसन आहे. या आसनामध्ये महादेवाच्या तांडवनृत्याचा आकार येतो अथवा नटराजाच्या मूर्तीच्या आकृतीबंधासारखा हे आसन आविष्कार करते म्हणूनच याला “नटराजासन’ म्हणतात. हे आसन करणाऱ्या प्रत्येकाला सुचित करत असते की “काम करा, पुढे चला.’
प्रथम दंड स्थितीत उभे राहावे
दोन्ही हात शरीराजवळ ठेवावे, नजर समोर असावी,
पहिल्यांदा डावा पाय गुडघ्यात दुमडून मागच्या बाजूस न्यावा
डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा किंवा चवडा पकडावा,
दुसरा हात म्हणजे उजवा हात सरळ जमिनीला समांतर ठेवावा.
नजर उजव्या हातांच्या बोटांकडे स्थिर करावी. डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही पायांनी हे आसन करावे.
उलट क्रमाने आसनातून बाहेर यावे
एकदा डावा पाय शरीराच्या मागील बाजूस नेऊन डाव्या हाताने घोटा पकडावा. डाव्या बाजूने आसन पूर्ण होताच उजव्या बाजूने करावे.
नटराजासनाचे फायदे
या आसनामुळे शरीराच्या प्रत्येक सांध्याला उत्तम प्रकारे व्यायाम होतो आणि सांधे सक्रिय होतात. ज्यांना सांधे दुखी जडली आहे त्यांनी नियमित हे आसन करावे. ज्यांचे गुडघ्यांचे ऑपरेशन झाले असेल त्यांनी हे आसन करू नये. खांदे, गुडघे, नितंब, घोटे, हातापायांची बोटे, हाताचे पंजे कणखर बनतात. मेरूदंडाला चांगला व्यायाम मिळतो आणि लचिकता येते. शरीरातील पचनशक्ती वाढते. या आसनामुळे काम करण्याची प्रेरणा मिळते आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते. कमरेतील दुखणी बरी होतात. शक्ती निर्माण करणारे असे नटराजासन म्हणूनच प्रत्येकाने नियमित करावे.