नवी दिल्ली : वरिष्ठ आयपीएस अधिकारी रवी सिन्हा यांची सोमवारी भारताच्या रॉ या बाह्य गुप्तचर एजन्सीचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तशी सरकारी अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. सिन्हा हे 1988 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील छत्तीसगड केडरचे अधिकारी आहेत. ते सध्या कॅबिनेट सचिवालयाचे विशेष सचिव म्हणून कार्यरत आहेत. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सिन्हा यांच्या दोन वर्षांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे, असे आदेशात म्हटले आहे.
मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे की, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सिन्हा यांची दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी RAW चे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. सिन्हा यांनी सामंत कुमार गोयल यांची जागा घेतली आहे. गोयल हे 30 जून 2023 रोजी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील.
कोण आहेत रवी सिन्हा ?
रवी सिन्हा हे 1988 बॅचच्या छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते केंद्रीय प्रतिनियुक्तीवर कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव पदावर कार्यरत आहेत. रवी सिन्हा हे दोन वर्षांसाठी रॉच्या प्रमुखपदी असतील.