पुणे – पुण्यातील एफसी रोडवरील प्रसिद्ध असलेले आणि खवय्यांच्या पसंतीचे असलेले हॉटेल वैशाली बळकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हॉटेल मालकाच्या मुलीने या बाबतचा आरोप केला असून तिच्या पतीनेच बंदुकीचा धाक दाखवून पॉवर ऑफ ऍटर्नी करून हॉटेल स्वत:च्या नावावर करून घेतल्याचे देखील तिने म्हटले आहे. एवढेच नाही तर लग्नाआधी पतीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून गर्भवती केल्याचा आरोप देखील तिने केला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पती, दीर, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी हॉटेल मालकाच्या मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून 2018 ते आतापर्यंत घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. आरोपी पतीने पीडित फिर्यादीला 2018 मध्ये घोले रोड येथील राहत्या घरी नेले. या ठिकाणी फिर्यादीला दारु व ड्रग्ज देऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. एवढेच नाही तर आरोपीने बंदुकीचा धाक दाखवून फिर्यादीला यांच्याकडून जबरदस्तीने हॉटेल वैशालीची पॉवर ऑफ ऍटर्नी स्वतःच्या नावावर करून घेतली. फिर्यादीच्या कंपनीच्या नावावर खरेदी केलेल्या 52 कोटी 50 लाखांच्या चार महागड्या कार परस्पर विकल्या.
तसेच फिर्यादी यांचे 1 कोटी 70 लाख रुपयांचे दागिने आणि इतर दोन महागड्या कार आरोपी आणि त्यांचा भाऊ वापरत असल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रार अर्जावरून शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणाचा तपास शिवाजी नगर पोलिस करत आहेत.
गुन्ह्याचा तपास सुरू
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सांगितले की, तक्रार प्राप्त झाल्यानुसार गुन्ह्याचा तपास हाती घेण्यात आला आहे. यासंदर्भात अगोदर आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज होता.