घरकुल वासीयांचे आंदोलन; करोनाचे रुग्ण ठेवण्यास तीव्र विरोध
पिंपरी (प्रतिनिधी) – करोना बधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने भविष्यात रुग्णालयांमध्ये जागा उरणार नाही. यासाठी महापालिकेने घरकुल येथील रिकाम्या इमारतींमध्ये तयारी सुरू केली आहे. मात्र स्थानिक नागरिकांकडून यास विरोध सुरू आहे. घरकुलच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांसोबत चर्चेत मागणी केली की, आधी आयुक्तांनी स्वतःच्या बंगल्यात चार रुग्ण ठेवावेत. मगच आमच्या घरकुलात रुग्ण आणावेत. जर जबरदस्तीने रुग्ण आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यास तीव्र विरोध केला जाईल, असा इशाराही घरकुलमधील नागरिकांनी दिला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात करोना बाधितांच्या संख्येत दिवसेदिवस वाढ होत चालली आहे. यामुळे महापालिकेची रुग्णालये रुग्णांसाठी कमी पडत आहे. रुग्णांची आणखी संख्या वाढल्यास अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी घरकुलमधील चार इमारतींमध्ये ठेवण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. यामुळे या इमारतींमध्ये विद्युत पुरवठा, पंखे, गिझर बसविण्याचे काम सुरू आहे. यामुळे घरकुलवासियांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. घरकुल हा दाट लोकवस्तीचा भाग आहे. येथील इमारतींच्या दोन गॅलरीमधील अंतर अवघे दहा फूटांचेच आहे. यामुळे नागरी भागात करोनाचे रुग्ण आणू नये, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
करोनाचे रुग्ण घरकुल परिसरात आणू नये, या मागणीसाठी घरकुल वासियांनी शनिवारी आंदोलन केले. जर घरकुलात करोनाचे रुग्ण आणायचे असतील तर आधी आयुक्तांनी आपल्या बंगल्यामध्ये करोनाचे चार रुग्ण तरी ठेवावेत. मगच घरकुलात रुग्ण आणण्याचा प्रयत्न करावा. जर रुग्ण आणण्याचा प्रयत्न केलाच तर त्यास स्थानिक रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश माने यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.