पिंपरी (प्रतिनिधी) – “करोना’चा कहर सुरूच असून शनिवारी देखील शंभराहून अधिक रुग्णांना “करोना’ची लागण झाली आहे. महापालिकेच्या प्रेसनोटनुसार गेल्या 24 तासात 165 रुग्णांना “करोना’ची लागण झाली आहे. तर महापालिकेचा डॅशबोर्ड सायंकाळी साडे सात वाजता एकूण रुग्णसंख्या 2650 इतकी होती, याचाच अर्थ की गेल्या 24 तासात शहरातील 245 रुग्णांना “करोना’ची बाधा झाली आहे. तसेच शनिवारी देखील “करोना’मुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महापालिकेच्या प्रेसनोटनुसार शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण 2565 रुग्णांना “करोना’ची लागण झाली होती. तर महापालिकेच्या डॅशबोर्डनुसार सायंकाळी साडे सात वाजेपर्यंत एकूण रुग्णसंख्या 2650 इतकी होती. पालिकेच्या प्रेसनोटनुसार शहरातील 160 आणि शहराबाहेरील 5 रुग्णांना लागण झाली आहे. शनिवारी 82 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत 1525 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर 1058 रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. शनिवारी महापालिकेच्या रुग्णालयात 566 नवे संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. 379 रुग्णांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. शनिवारी महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 1483 रुग्ण आणि संशयित दाखल होते. शनिवारी गांधीनगर पिंपरी येथील 52 वर्षांच्या पुरुषाचा आणि पिंपळे सौदागर येथील 56 पुरुषाचा “करोना’मुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत महापालिकेने 16200 संशयितांच्या “स्वॅब’चे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 13172 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.