कराड (प्रतिनिधी) – केंद्र सरकारतर्फे दरवर्षी राबवण्यात येणार्या ‘स्वच्छ सर्वेक्षण’ स्पर्धेत 2023 या वर्षात कराड नगरपालिकेने देशाच्या पश्चिम विभागात प्रथम क्रमांक पटकवला आहे.
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत देशाच्या पश्चिम विभागात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. या पाच राज्यातील 50 हजार ते एक लाख लोकसंख्या असलेल्या पालिकांमध्ये कराड पालिकेने प्रथम क्रमांक मिळवला आहे. याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. कराड पालिकेने स्वच्छतेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
यापूर्वी 2019 व 2020 अशी दोन वर्षे कराडने देशात प्रथम क्रमांक, तर 2021 साली सहावा आणि 2022 साली देशात तिसरा क्रमांक पटकवला होता. मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेने यावर्षी स्पर्धेसाठी जोरदार तयारी केली होती. या यशाबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.