सॅनिटायझरच्या दर्जावरही शंका ः विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक
पिंपरी (प्रतिनिधी) – लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात रस्त्यांवर, दुकानात, कार्यालयांत वर्दळ वाढली आहे. बाजारपेठेतसुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीकरिता येत आहेत. महापालिका क्षेत्रात करोना रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत आहे. शहरातील रस्त्याच्या कडेला, सिग्नलवर स्वस्तात मास्क विक्री केली जात आहे. अनेक ठिकाणी सॅनिटायझरचे कॅन विकले जात आहेत. मात्र या वस्तू आरोग्याच्या दृष्टीने किती योग्यतेच्या आहेत, हे पाहणे तितकेच आवश्यक आहे.
पिंपरी परिसरातील रस्त्याच्या क़डेला, चौकात, हातगाड्यांवर मास्क सॅनिटायझरची विक्री केली जात आहे. 25 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत मास्क सॅनिटायझरची विक्री सुरु आहे. यामध्ये रंगीबेरंगी मास्क उपलब्ध आहेत. त्याचबरोबरह सॅनिटायझरचीही विक्री केली जात आहे. मुंबई पुणे रस्ता, चौकातील सिग्नलवर, पिंपरी बाजारपेठेत हातगाड्यांवर मास्क विकले जात आहेत. रस्त्याच्या कडेला असलेले रंगीबेरंगी मास्क नागरिकांना आकर्षित करत आहेत. मास्क खरेदी करताना त्याला प्रत्येक नागरिकाच स्पर्श होतो. ते मास्क पॅकबंद नसतात. त्याचबरोबर ते मास्क तोंडालाही लावून बघितले जातात. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. स्वस्तात मास्क मिळतात म्हणून त्याचा वापर करणे धोकादायक ठरू शकतो. पॅकबंद असलेले किंवा घरी तयार केलेले मास्कच वापरण्यास योग्य आहेत. दर्जाहीन तसेच स्पर्श झालेले मास्क वापरल्यामुळे करोना संक्रमणाचा धोका जास्त आहे.
विक्रेत्यांसाठी नियमावली आवश्यक
रस्त्यावर विक्री करणारे हे सामान्य कुटुंबातील तसेच परप्रांतीय आहेत. मास्क उघड्यावर विकण्याऐवजी पाकिटात बंद असलेले मास्क विकण्यासच महापालिकेने परवानगी दिली पाहिजे. पाकिटबंद असल्याने स्पर्श टाळता येईल. यामुळे रोजगारही मिळेल. तसेच नागरिकांना योग्य दर्जा असलेले मास्कही उपलब्ध होतील.