वाघोली (प्रतिनिधी) – लोणीकंद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत वाघोली चौकी समोर एक युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली. तसेच केसनंद चौकी मध्ये तक्रारदाराला अपमानास्पद वागणूक दिल्याची देखील घटना घडली असून त्या युवकाने केसनंद चौकीच्या प्रभारी अधिकाऱ्याविरुद्ध पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहेत.
लोणीकंद पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांची अप्पर पोलीस आयुक्तांनी निलंबन करून देखील पोलीस सुधारत नसल्याचे चित्र निर्माण झाले असून गेल्या तीन महिन्यांपासून न्यायासाठी चकरा मारणाऱ्या एका युवकाने न्यायासाठी पोलीस ठाण्यात दि. १ मार्च रोजी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला असून तसे निवेदन युवकाने पोलीस आयुक्तांना दिले आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्यात नागरिकांना तक्रार दिल्यानंतर अर्ज चौकशी साठी हेलपाटे मारावे लागत असल्याचे या प्रकारातून दिसून येत आहे. एका युवकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात दि. ११ नोव्हेंबर 2023 रोजी हद्दीतील जमिनीच्या दस्तऐवजामध्ये खाडाखोड करून फसवणूक केल्याचा तक्रार अर्ज पोलीस ठाण्यात दिला होता.
गेल्या तीन महिन्यापासून संबंधित युवक न्यायासाठी पोलीस ठाण्यात वारंवार चकरा मारत आहे. याबाबतीत संबंधित तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब टापरे यांनी सांगितले की तक्रार अर्जाचा तपास करून बदली होण्यापूर्वी पंधरा दिवस अगोदर गुन्हा दाखल करणे कामी वरिष्ठ कार्यालयास टीपणी पाठवून दिली आहे. पुढील परवानगीसाठी सहायक पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपायुक्त यांच्या परवानगीसाठी तसेच तपास कामी पाठवण्यात आले आहे. असे टापरे यांनी सांगितले.
माननीय पोलीस उपायुक्तांनी याप्रकरणी इतर काही माहिती मागवली असून तक्रारदार यांच्याकडून चौकशी करून त्या माहितीचा अहवाल माननीय उपायुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे.
– कैलास करे ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक | लोणीकंद )