पुणे – पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची पदोन्नतीने होमगार्डचे महासमादेशक म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी नागपूर् शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमितेश कुमार हे नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदी सर्वाधिक काळ राहिलेले अधिकारी आहेत. तर सह पोलीस आयुक्त म्हणून प्रवीण पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पवार हे कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. तर अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) या पदावर शैलेश बलकवडे यांची नियुक्ती झाली आहे. तर पंकज देशमुख यांची पुणे (ग्रामीण) पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे शहरात मागील काही दिवसांत बदल्यांचे सत्र सुरू आहे. जवळपास सर्वच पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक आणि निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यातच पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची बदली झाली आहे. राज्यातील एकूण १७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. अमितेश कुमार यांची पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. सप्टेंबर २०२० पासून अमितेश कुमार नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी आहेत.
नागपूरच्या इतिहासात सर्वाधिक काळ पोलीस आयुक्त म्हणून रहाण्याचा त्यांचा विक्रम आहे. १९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अमितेश कुमार यांनी औरंगाबाद शहराचे पोलिस आयुक्त म्हणून तर मुंबई वाहतूक पोलीस शाखेचे सहआयुक्त म्हणून काम केले आहे. नागपूर पोलीस आयुक्त होण्याआधी अमितेश कुमार हे राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत होते. २००७ मध्ये भारत विरुद्ध क्रिकेट सामना खेळत असताना वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू मरलोन सॅम्युअल आणि दाऊद इब्राहिमच्या हस्तक मनोज कोचर यांच्यामधील होणारी बातचीत रेकॉर्ड करून क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. या कामगिरीसाठी अमितेश कुमार यांची संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती.
इतर बदल्या पुढील प्रमाणे –
नाव सध्याचे पद नवीन नियुक्तीचे पद
१)संजय शिंदे सह आयुक्त पिंपरी चिंचवड विशेष पोलीस महानिरीक्षक (सीआयडी)
२) रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त उत्तर विभाग ,पुणे विशेष पोलीस महानिरीक्षक (सीआयडी)
३) नामदेव चव्हाण उप महानिरीक्षक(सीआयडी) विशेष पोलीस महानिरीक्षक रा.रा.पो.बल (नागपूर)
४) बसवराज तेली पोलीस अधीक्षक, सांगली उपमहानिरीक्षक(सीआयडी)
५) शैलेश बलकवडे समादेशक रा.रा.पो.बल,पुणे अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) ,पुणे
६) मनोज पाटील उप आयुक्त, मुबई अपर पोलीस आयुक्त,उत्तर विभाग, पुणे
७) पंकज देशमुख पोलीस अधीक्षक (सीआयडी) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण