हप्त्यासाठी दहशत : हत्यारांचा सर्रास वापर
पुणे – शहरातील सर्वसामान्य नागरिक करोनाच्या भीतीतून हळूहळू बाहेर पडत आहेत. मात्र, दुसरीकडे त्यांच्यावर तथाकथित भाईंच्या दहशतीचे सावट निर्माण झाले आहे.
करोनामुळे जसे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले, तसेच “भाई’ लोकांचेही आर्थिक हाल झाले. यामुळे लॉकडाऊन शिथिल होताच गल्लीबोळांतील “भाई’ पुन्हा सक्रीय झाले आहेत.
हे “भाई’लोक हप्त्यासाठी दुकानदार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांनाही नडू लागले आहेत. तलवार, कोयता, लोखंडी रॉड अशी शस्त्रे हवेत फिरवत समोरच्यावर वार करत दहशत पसरवत आहेत. यांची आर्थिक परिस्थिती इतकी खालावली आहेख की जेवणाच्या फुकटच्या पार्सलसाठीही हॉटेलमालकांना मारहाण केली जात आहे.
“भाई को तकलीफ’; दोघांवर कोयत्याने वार
तथाकथित “भाई’शी भांडणे केल्याने दोघांवर “भाई’च्या पंटरने कोयत्याने वार केले. ही घटना ए.पी. लोहियानगर येथे घडली. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी करण साळुंके याने फिर्याद दिली. फिर्यादी त्याचा चुलत भाऊ स्वप्नील आणि पुतण्या प्रेम यांच्यासोबत हातगाडीवर गप्पा मारत थांबला होता. यावेळी आरोपी तेथे कोयता घेऊन आला. त्याने 15 दिवसांपूर्वी त्यांच्या वस्तीत फिर्यादीची एकाबरोबर भांडणे झाली होती,त्याचा जाब विचारला. “मै कोंढवा को जानेके बाद तू बस्ती का भाई हो गया क्या, तू बस्ती के लडके लेके हमारे भाई को तकलीफ देता है क्या’ असे विचारत लोखंडी कोयत्याने त्याच्यावर वार केले. यानंतर त्याचा स्वप्नीलच्या मांडी आणि पायावरही वार केले. यानंतर कोयता हवेत फिरवत दहशत निर्माण केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश माने करत आहेत.
साडेसतरानळीचा भाई; फुकटचे जेवण खाई
हॉटेल मालकाने पार्सलचे पैसे मागितल्यावर “मी साडेसतरा नळीचा भाई आहे, मला पैसे मागतो’ असे म्हणत दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना अमनोरा पार्कमागे तुपे कॉर्नर येथे घडली. याप्रकरणी समीर संजय सोनवणे व अनिल थोरात यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. फिर्यादी मनीष सिंग (26, रा.फुरसुंगी) यांचे “टेस्टी पॉईंट’ नावाचे हॉटेल आहे. तेथे दोघा आरोपींनी पार्सल घेतले. फिर्यादीने पार्सलचे पैसे मागितले असता, आरोपींनी त्याला हॉटेलच्या बाहेर बोलावून घेतले. “मी भाई आहे साडेसतरा नळीचा मला पैसे मागतो’ असे म्हणत लाकडी दांडक्याने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून पळ काढला. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक गायकवाड करत आहेत.
हप्ता द्या, नाहीतर…
“मी गल्लीचा दादा आहे, मला नियमित हप्ता द्या नाहीतर तुम्हाला कापून टाकीण’, असा तलवारीचा धाक दाखवत हडपसर येथील वैदुवाडीत दहशत माजवली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी पापासिंग दुधाणी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. फिर्यादी महिलेच्या घरी आरोपीने येऊन तिच्या मुलाला तलवारीचा धाक दाखवत 5 हजार रुपयांचा हप्ता मागितला. मात्र, तेव्हा त्याने न दिल्याने तो पुन्हा दुसऱ्या दिवशी तलवार घेऊन दाखल झाला. त्याने फिर्यादीच्या अर्धांगवायू झालेल्या पतीच्या गळ्याला तलवार लावली. यानंतर “मला पाच हजार हप्ता दे, नाहीतर तुला पाहून घेईल, मी येरवडा जेलमधून सुटलेला गुन्हेगार आहे’, अशी धमकी दिली. फिर्यादीने आरडाओरडा केल्यावर गल्लीतील लोक घराबाहेर धावत आले. यावेळी त्याने तलवार हवेत फिरवून “मी या गल्लीतील दादा आहे, सर्वांनी मला हप्ते द्या, नाहीतर मी एकेकाला कापून टाकीण’, अशी धमकी दिली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण करत आहेत.
“मै हूँ यहॉं का भाई’
खडकी येथील महादेवनगरमध्ये एका तथाकथित “भाई’ने सिलिंडर विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यास मारहाण करून 12 हजारांची रोकड लुटली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फिर्यादी कैलास बिश्णोई (22, लोहगाव) हा टेम्पोमधून गॅस एजन्सीचे सिलिंडर डिलिव्हरीसाठी गेला होता. त्याच्या टेम्पोचे डिझेल संपल्याने त्याने टेम्पो रस्त्यात लावला. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने “तुम लोग बाहरसे आके दादागिरी करते हो क्या, मै यहॉं का भाई हूँ’ म्हणत त्याला मारहाण केली. फिर्यादी यांचा सहकारी भांडणे सोडविण्यास पडला असता, त्याला धक्का मारून आरोपीने त्याच्या खिशातील 12 हजारांची रोकड घेऊन पळ काढला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रताप गिरी करत आहेत.