राजगुरूनगर -वरची भांबुरवाडी (ता. खेड) येथील पोलीस पाटील सचिन भिवसेन वाळुंज (वय 35) यांच्यावर जुन्या राजकीय वादातून गोळीबार झाला. ही घटना रविवारी (दि. 28) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भांबुरवाडी गावात घडली. यात त्यांच्या हाताच्या मनगटाला गोळी लागली असून हाताचे हाड फॅक्चर झाले आहे. याप्रकरणी तिघांची नावे निष्पन्न झाली असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सौरभ अनिल ढोरे, विपुल भिमाशंकर थिगळे, अतुल ऊर्फ बंटी काळूराम भांबुरे (सर्व रा. वरची भांबुरवाडी ता. खेड) असे गोळीबार करणाऱ्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाण्याची टाकी बांधायची जागा दाखविण्यासाठी ठेकेदार संजज कौटकर यांनी सचिन वाळुंज यांना फोन केला. त्यानुसार वांळूज हे कारमधून गावात गेले होते. तेथे कौटकर यांच्यासोबत आलेले मित्र व वाळुंज यांच्यामध्ये चर्चा सुरू होती.
दरम्यान, त्याठिकाणी वरील तिघे आगोदरच बसलेले होते.अचानक फटाक्यासारखा मोठा आवाज आला. त्यातील एकाने गावठी कट्ट्यातून फायर केले अन् वाळुंज यांच्या हातातुन रक्त वाहत होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बडाख, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले सह पोलिसांनी वाळुंज यांची भेट घेऊन आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना केली. पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.