T20 World Cup 2024 Semi-finalist Prediction : T20 विश्वचषक 2024 हळूहळू जवळ येत आहे. टीम इंडियाने या स्पर्धेसाठी संघाची घोषणाही केली आहे. भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेनेही विश्वचषकासाठी संघ घोषित केले आहेत. विश्वचषकापूर्वी क्रिकेट तज्ञ आणि माजी दिग्गजांनी अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे, ज्यामध्ये इंग्लंडचा माजी महान कर्णधार मायकेल वॉनचाही समावेश आहे. वॉनने स्पर्धेसाठी आपले चार उपांत्य फेरीतील संघ निवडले, परंतु विशेष म्हणजे त्याने टीम इंडियाला यातून वगळले आहे.
गेल्या टूर्नामेंटमध्ये म्हणजे 2022 मध्ये, भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली आणि उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. मात्र उपांत्य फेरीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत यावेळीही भारतीय संघाची कामगिरी पाहण्यासारखी असेल.
पण स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच मायकेल वॉनने मेन इन ब्लूला म्हणजेच टीम इंडियाला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर काढले आहे. टीम इंडिया टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकणार नाही, असा विश्वास वॉनला आहे. त्याने ट्विटरवर (एक्स) उपांत्य फेरीतील संघांबद्दल लिहिले आहे. “आगामी T20 विश्वचषकात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे उपांत्य फेरीचे संघ असतील, असे वॉनने भाकीत केले आहे.
My 4 Semi finalists for the T20 WC … England,Austrlalia,South Africa and the West Indies .. #T20WC2024
— Michael Vaughan (@MichaelVaughan) May 1, 2024
गेल्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाची अशी होती कामगिरी…
भारताने स्पर्धेची सुरुवात विजयाने केली होती. पहिल्या सामन्यात मेन इन ब्लूने पाकिस्तानचा पराभव केला होता. यानंतर उपांत्य फेरी गाठण्यापर्यंत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ एकच सामना हरला. मात्र उपांत्य फेरीत त्यांना इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. उपांत्य फेरीत भारताचा पराभव केल्यानंतर इंग्लंडने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.