पुणे : पुणे शहरातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी डिजिटल पास काढताना खोटी माहिती देणाऱ्याविरुद्ध पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरांतर्गत तसेच शहरातून इतर जिल्ह्यात जायचे असल्यास डिजिटल पास असणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांना ऑनलाइन अर्ज करून योग्य ती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी www.punepolice.in ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. योग्य ती माहिती भरून कागदपत्रे जोडल्या नंतर पुणे पोलिसांमार्फत पडताळणी होऊन मगच परवानगी दिली जाते. परंतु पास मिळवण्यासाठी काही लोकांनी चुकीची आणि खोटी माहिती भरल्याचे पुणे पोलिसांच्या निदर्शनास आले.
याप्रकरणी तपासणी केली असता त्या सर्व अर्जासाठी एकच मोबाईल नंबर तसेच एकच आधारकार्ड आणि मेडिकल सर्टिफिकेट जोडल्याचे समोर आले. अर्जदार हे मुंबई व ठाणे परिसरात राहणारे आहेत. त्यांना तेथून कोकण, सातारा, सांगली असे जायचे होते परंतु त्यांना मुंबई व ठाणे प्रशासनाकडून पास न मिळाल्याने त्यांनी शक्कल लढवली आणि आणि मुंबई ते पुणे असा अर्ज करून आपण पुण्यात राहत असल्याची खोटी माहिती अर्जात भरली. ते सर्व पास ना मंजूर करत पोलिसांनी चौकशी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.