पुणे – “आमच्या भागात वाहतूक समस्या, पाणीपुरवठा, ड्रेनेज समस्या आहेत. त्याकडे लक्ष देण्यास कोणीही तयार नाहीत. भाऊ, आता तुम्हीच आमच्या समस्या सोडवा,” अशी साद वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी पुणे लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवर रवींद्र धंगेकर यांना घातली.
धंगेकर यांनी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात पदपात्रा काढली. या वेळी नागरिकांनी त्यांच्याकडे समस्यांचा पाढा वाचला. त्यात विश्रांतवाडी चौक, जेल रोड आणि टिंगरेनगर, विमानतळ रस्ता येथील वाहतूक कोंडीबाबत जास्त तक्रारी होत्या. तसेच संपूर्ण वडगावशेरीत कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा, जुनाट झालेली ड्रेनेज सिस्टिम याबाबतच्या तक्रारी जास्त होत्या. नागरिकांचे हे सर्व प्रश्न धंगेकरांनी ऐकून घेत या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेली ही पदयात्रा विविध सोसायट्या, इंदिरानगर, मेंटल हाॅस्पिटल कॉर्नर परिसर, कस्तुरबा सोसायटीमार्गे जाऊन आदर्शनगर परिसरात समाप्त झाली. वडगावशेरी ब्लॉक अध्यक्ष राजू ठोंबरे, येरवडा ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट, वडगाव शेरी महिला ब्लॉक अध्यक्ष शिवानी माने, माजी नगरसेवक सुनील मलके, माजी नगरसेवक राजेंद्र शिरसाट, माजी नगरसेवक पप्पू भोगले, माजी नगरसेवक संगीता देवकर, रमाकांत साठे, राकेश कुशवाह, डॅनियल मगर, प्रभाग २ वडगाव शेरीचे उपाध्यक्ष सचिन भोसले, विल्सन संदेवळ, योगेश शिर्के आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
विविध संस्था, संघटनांचा पाठिंबा
पुणे लोकसभा निवडणुकीसाठी आमदार धंगेकर यांना विविध संस्था संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( कांबळे )गटाच्या वतीने केंद्रीय सेक्रेटरी एच. बी. जाधव यांनी धंगेकर यांना पत्र दिले. या शिवाय महाराष्ट्र कामगार महामंडळ, सफाई सेवा सहकारी संस्था मर्यादित आणि दलित पँथर कामगार संघटना यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे.