आता नियमित रुग्णांचे डॉक्‍टरांना ‘टेन्शन’

लॉकडाऊन संपल्यावर आणखी ताण वाढणार?


आता रुग्णालयांत गर्दी वाढण्याची शक्‍यता

पुणे – करोना आणि “लॉकडाऊन’मुळे सर्वच ठप्प आहे. रुग्णालयांमध्ये करोनाबाधितांना उपचार देताना डॉक्‍टर, परिचारिकांची दमछाक होत आहे. लॉकडाऊनमुळे पुढे ढकललेल्या शस्त्रक्रिया आणि अन्य गंभीर आजारी व्यक्‍तींना वेळेत उपचार देणे अत्यावश्‍यक आहे. त्यामुळे आता रुग्णालयांत गर्दी वाढण्याची शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत डॉक्‍टरांचा ताण अधिक वाढणार आहे.

करोनामुळे अत्यावश्‍यक शस्त्रक्रिया वगळता, अन्य आजारांवर “टेलिमेडिसिन’चा सल्ला डॉक्‍टर देत आहेत. कारण, आजारी असलेल्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी असते आणि अशा व्यक्तीला करोना संसर्गाची भीती अधिक आहे. प्रामुख्याने कॅन्सर, मधुमेह, उच्चरक्तदाब, संधिवात, अस्थमा या आजारांवरील रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्‍यक आहे. बहुतांश रुग्णालयांनी अत्यावश्‍यक सोडल्या, तर अन्य सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या. आता राज्यातला लॉकडाऊन आता 30 जूनपर्यंत वाढला आहे. पण, शस्त्रक्रिया आणखी पुढे ढकलणे शक्‍य नाही. गंभीर आजारांवर वेळेत उपचार झाले नाहीत, तर ते रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे आता रुग्णालयांमध्ये गर्दी होण्याची शक्‍यता अधिक आहे.

जोखीम पत्करून उपचार द्यावे लागणार
दात, कान, त्वचा, डोळ्यांचे विकार यांसह अन्य रुग्णांनी लॉकडाऊनमुळे तीन महिने कसेतरी सहन केले. कारण, करोनाचा प्रसार हा नाक-तोंडासह चेहऱ्यावरच्या भागावरून होऊ शकतो. त्यामुळे या अवयवांच्या आजाराशी संलग्न असलेल्या रुग्णांची तपासणी केली जात नव्हती. शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या.

मात्र, अजून किती दिवस लॉकडाऊन राहिल याची शाश्‍वती नाही, तर दुसरीकडे शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही, अशा परिस्थितीत खासगी स्पेशालिस्ट रुग्णालय सुरू झाल्यानंतर डॉक्‍टरांनी सर्व जोखीम पत्कारून उपचार द्यावे लागणार आहेत.

ससून रुग्णालयाचीही दमछाक
ससून रुग्णालयाच्या ओपीडी विभागात दोन ते अडीच हजार रुग्णांची तपासणी होते. मात्र, मागील तीन महिन्यांत ही संख्या निम्म्याने घटली आहे. दरम्यान, येथे येणाऱ्या अन्य व्यक्‍तींना करोना संसर्ग होऊ नये, यासाठी सुरुवातीपासूनच ससूनच्या नवीन इमारतीमध्ये कोविड वॉर्ड सुरू केला आहे. दरम्यान, नियमित उपचारांसाठी येणाऱ्यांची गर्दी वाढण्याची शक्‍यता असल्यामुळे प्रशासनासमोर मोठा प्रश्‍न पडला आहे. कारण, करोनामुळे सध्याचे कर्मचारी कोविड वॉर्डमध्ये दिवस-रात्र काम करत आहेत. आता “ओपीडी’ची संख्या वाढल्यावर उपलब्ध डॉक्‍टरांमधून रुग्णसेवा देताना दमछाक होणार आहे.

कसे करणार नियोजन?
एका वॉर्डमध्ये 30 रुग्ण असतील, तर प्रत्येक युनिटप्रमाणे नियोजन केले तर चार प्रमुख डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध निवासी डॉक्‍टर आणि परिचारिका यांच्या माध्यमातून उपचार देऊ शकतात. मात्र, सध्या शासकीय आणि खासगी रुग्णालयात यातील बहुतांश डॉक्‍टर कोविड वॉर्डमधील बाधितांना उपचार देत आहेत. त्यामुळे अन्य रुग्णांना उपचार देण्यासाठी पुरेसे डॉक्‍टर, कर्मचारी स्टाफ सध्या उपलब्ध नाही. ज्यावेळी अन्य आजाराचे रुग्ण उपचारांसाठी गर्दी करतील, त्यावेळी काय परिस्थिती होईल, या परिस्थितीला प्रशासन कसे सामोरे जाणार, याची उत्तरे रुग्णालयांना शोधावी लागणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.