नाशिक : नाशिकसह जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी शिरवाडे वणी फाट्यावर दुचाकी अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता वणी सापुतारा मार्गावरील खोरीफाट्यावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात चार जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून या अपघाताने मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नाशिक जिल्ह्यातील वणी-सापुतारा महामार्गावर खोरीफाट्याजवळ मारुती सियाज व क्रूझर यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला झाला. तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यानंतर अपघातानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत जखमींना गाडी बाहेर काढले.
दरम्यान या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये विनायक गोविंद क्षिरसागर, योगेश दिलीप वाघ, जतिन अनिल फावडे, रविंद्र मोतीचंद चव्हाण यांचा समावेश आहे. सियाझ कार ही सापुताऱ्याकडून वणीकडे येत असताना समोरून येणाऱ्या क्रुझर गाडीशी तिची समोरासमोर टक्कर झाली. अपघातावेळी गाड्या एकमेकांवर आदळल्याने मोठा आवाज झाला.
अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झालेला होता. या अपघातात कमळी युवराज गांगोडे, कल्पना सुभाष सोळसे, तुळशीराम गोविंदा भोये, ललीता युवराज कडाळे, रोहिदास पांडुरंग कडाळे, योगेश मधुकर सोळसे, सुभाष काशिनाथ सोळसे, देवेंद्र सुभाष सोळसे, नेहल सुभाष सोळसे हे प्रवाशी जखमी झाले आहेत. या सर्वांना वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना 108 रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.