आंबेगाव-खेड तालुक्यातील तलावांबाबत वाफगांव, पारगांव, गुळाणी गावांच्या हद्दीवरील शेतकऱ्यांना सूचना
मंचर -आंबेगाव आणि खेड तालुक्याच्या सरहद्दीवरील वाफगांव, पारगांव, गुळाणी गावांतील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या तलावातील पाण्याचा वापर लाभक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांनी करू नये, तसेच मुक्ताई पाणीवापर संस्थेची निवडणूक त्वरीत घ्यावी, असे आदेश जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता आर. डी. मोहिते यांनी दिले.
तलावावरील मुक्ताई पाणीवापर संस्थेविरुद्ध तलावाअंतर्गत लाभधारकांच्या तक्रार निवारणाबाबत शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमावेत मुख्य अभियंता प्राधिकरण विभाग पुणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.यावेळी अधिकारी आणि मुक्ताई पाणी वापर संस्थेचे संचालक, सभासद उपस्थित होते.
पुणे जलसंपदा विभागाचे अधि,,धीक्षक अभियंता संजीव चोपडे, चासकमान विभागाचे कार्यकारी अभियंता बी. के. शेटे, सहायक अभियंता बी. पी. शिंदे, शाखा अभियंता व्ही. एम. पाटील, मुक्ताई पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष जयेश जवळेकर, संचालक सुरेश कराळे,उद्योजक भाऊसाहेब सावंत पाटील, शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी राजू जवळेकर यांच्यासह संस्थेचे सभासद आणि तलावावरील लाभधारक बैठकीस उपस्थित होते.
100 हे. पेक्षा जास्त लाभक्षेत्र सिंचनापासून वंचित
लघू जलसंपदा तलावाच्या लाभक्षेत्रात पोटचाऱ्या अस्तित्वात नाहीत, तसेच लाभक्षेत्रातून रस्ता जात असल्यामुळे पाणी रस्त्याच्या पलीकडे नेता येत नाही, त्यामुळे कालव्यावरील 100 हेक्टरपेक्षा जास्त लाभक्षेत्र सिंचनापासून वंचित राहते. तरी नदीत पाणी सोडून या क्षेत्रास नदीतून सिंचन करण्यात यावे, तसेच एका पाणी परवान्यास एकच विद्युत पंप बसवणे, असे निर्देश मुख्य अभियंता यांनी दिले.
बैठकीतील निर्णय…
वाफगाव तलावावरील कार्यरत मुक्ताई पाणी वापर संस्थेची मुदत संपली असल्याने संस्थेची निवडणूक त्वरीत घ्यावी. नवीन संचालक मंडळ येईपर्यंत सध्याच्या संचालक मंडळास मुदतवाढ द्यावी. संस्थेच्या सभासदांमध्ये जलाशयाच्या पाणीवापराबाबत सामंजस्याने तोडगा न निघाल्यास जलाशयावर दिलेल्या सर्व पाणी परवान्यांचा आणि अधिसूचनांचा फेरआढावा घेऊन नव्याने उपसाचे क्षेत्र निश्चित करून अधिकचे क्षेत्र वगळावे. लघू पाटबंधारे विभाग तलावांच्या पाणी वापर संस्थेची अधिसुचना-3 नव्याने काढून कार्यक्षेत्र निश्चित करावे.