नगर – जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा..ढोल ताशांचा गजर…हातामध्ये भगवे झेंडे घेवून फेटे बांधलेल्या तरूणाईची मोटारसायकल रॅली…चौकाचौकामध्ये चालू असणारे शिवाजी महाराजांचे पोवाडे…अन् जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या विद्यार्थ्यांची भव्य दिव्य मिरवणूक …अशा उत्साहपूर्ण वातावरणात नगर शहरात आज (दि.19) शिवजयंती साजरी करण्यात आली.
विविध संस्था, संघटना, शाळा,महाविद्यालयाच्या सहभागातून आकर्षक मिरवणूक आज काढण्यात आली. मिरवणुकीत विद्यार्थी, कार्यकर्त्यांनी खेळांचे डाव, कसरती सादर केल्या. शाहिरी पोवाड्यातून शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती सादर करण्यात आली.
ढोल,लेझिम,दांडिया, हलगीची पथके, वारकऱ्यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी, महिलांसह कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत व पटके परीधान करून, भगवे झेंडे घेऊन आले आले होते. विविध पदाधिकारी व अधिकाऱ्यांनीही लेझिम खेळण्याचा आनंद लुटला. शिवराय, संत तुकाराम महाराज, मावळ्यांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी केली होती. मिरवणुकीच्या अग्रभागी बॅंडपथक होते.
माळीवाडा-पंचपीर चावडी-माणिक चौक-कापड बाजार-तेलीखुंट-चितळे रस्ता-चौपाटी कारंजा-दिल्लीगेट मार्गे रेसिडेन्सियल विद्यालयाच्या प्रागणांत मिरवणूक विसर्जीत झाली. नगर शहरातील केडगाव, भिंगार, सावेडी, माळीवाडा येथील विविध चौकातही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विविध संघटना, मित्र मंडळाच्या कार्यकर्यांनी पूजन केले.
स्वराज्य कामगार संघटनेच्यावतीने नवनागापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरी केली. बाजार समितीच्या आवारामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पुतळा येथे टेम्पो मालक-चालक संघटनेच्यावतीने आकर्षक सजावट करण्यात आली होती. रेल्वे स्टेशन रोडवरील शिवनेरी चौकातील नवसहकार युवा प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्यदिव्य देखावा व कारंजा सादर केला.
रेल्वे स्टेशन कर्मचाऱ्यांच्यावतीने शिवजयंती उत्साहाता साजरी केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्यासमोर आकर्षक सजावट करण्यात आली. केडगाव वेस येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज एकत्र येऊन शिवजयंती साजरी केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, मनसे विद्यार्थी सेना व समाजवादी पार्टीच्या वतीनेही शिवरायांना अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जिजाऊ ब्रिगेड, यशस्विनी महिला ब्रिगेड, राजे प्रतिष्ठान व छावा संघटनेच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन पायी रॅली काढण्यात आली. महिला व विद्यार्थी सहभागी झाले होते.
माळीवाडा बसस्थानक
नगर येथील माळीवाडा बसस्थानक जवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अनिल राठोड, महापौर बाबासाहेब वाकळे आदिंसह मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस अधिक्षक सागर पाटील , आमदार संग्राम जगताप, जिल्हा मराठा प्रसारक समाजचे अध्यक्ष नंदकुमार झावरे , सभापती लताताई शेळके, शिवप्रहारचे अध्यक्ष संजीव भोर, शिवाजीराव कराळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
माळीवाडा
माळीवाडा येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ शिवजयंतीनिमित्त विविध संघटनांच्यावतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रा.माणिकराव विधाते, अखिल भारतीय समता परिषद महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, डॉ.सुदर्शन गोरे, फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, संत सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष निखिल शेलार, फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दिपक खेडकर, दिपक साखरे, दत्तात्रय जाधव, लवेश गोंधळे, महेश गाडे, निखिल ताठे, ऋषीकेश ताठे, आशिष भगत, श्रीकांत आंबेकर आदी उपस्थित होते.
मिरवणुकीचे मुस्लिम बांधवांकडून स्वागत
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे कापड बाजार येथे मुस्लिम समाजाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. तर मुस्लिम समाज, मोची गल्ली व्यापारी असोसिएशन व हाजी अजीजभाई चष्मावाला प्रतिष्ठानच्या वतीने मिरवणुकीत सहभागी विद्यार्थ्यांना पाणी व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचा प्रारंभ पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके व मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य शिवाजी साबळे, हामजा चुडीवाला, नईम सरदार, जुनेद शेख, अकलाख शेख, संतोष गोयल, राजू साखला, योगेश बेंद्रे, नवीद शेख, फैय्याज शेख, समीर शेख, इकराम तांबटकर, रमीज शेख, शाकिर शेख, सरफराज चुडीवाला, अबरार पठाण, रफिक रंगरेज आदिंसह मुस्लिम समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भिंगार शहरातून मुस्लिम समाजाच्या वतीने मोटर सायकल रॅली काढण्यात आली.
जिल्हा परिषद
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद आवारात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले समवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल नितीन उबाळे संजय कदम डॉ. संदीप सांगळे डॉ. सुनिल तुंबारे श्रीकांत अनारसे सुनील कुमार राठी सुभाष कराळे विकास साळुंके अशोक काळापाड एम.पी. कचरे आदींसह कर्मचारी उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली.
मोहंमदिया एज्यूकेशन सोसायटी
मोहंमदिया एज्यूकेशन सोसायटीच्या मदर तेरेसा उर्दू ज्यूनिअर कॉलेज, मासुमियॉं डि.टी.एड्. व बी.एड्. कॉलेज, मौलाना आझाद हायस्कूल व सावित्रीबाई फुले उर्दू प्राथमिक कन्या शाळेमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अब्दुस सलाम बोलत होते. याप्रसंगी मातोश्री उर्दू हायस्कूल, आलमगीरचे मुख्याध्यापक जमीर शेख यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी प्रा.एजाज शेख, शेख इनायतुल्ला आदी उपस्थित होते.
दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत शिवजयंती
सावेडी, पाइपलाइन रोडवरील हडकोत साई सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत शिवजयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रतिष्ठानचे स्वप्नील वाघ, निखिल जाधव, अक्षय अकोलकर, योगेश पिंपळे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, डॉ.मिनल काळे, अनिशा शेख, सविता साबळे आदी उपस्थित होते.