नगर -गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभर गाजत असलेल्या बनावट डीझेल प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने जेरबंद केले. त्यांना न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
बुधवारी (दि. 11) रात्री डीझेल रॅकेटमधील मुख्य सूत्रधार शब्बीर देशमुख व त्याचा मुलगा मुदस्सर देशमुख यांना अटक करण्यात आली. राहता तालुक्यातील लोणी परिसरातून या दोघांना रात्री ताब्यात घेण्यात आले. तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या पथकाने नगर शहरातील जीपीओ चौकात छापा घालून बनावट डीझेल जप्त केले होते. याप्रकरणी भिंगार कॅंप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास शहर विभागाचे उपअधीक्षक विशाल ढुमे हे करत होते. मात्र गुन्हा दाखल होवून पंधरा दिवस उलटले, तरी तपासात प्रगती न झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी उपअधीक्षक मिटके यांच्याकडे हा तपास वर्ग केला होता. तपास वर्ग झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच मिटके यांनी मुख्य सूत्रधाराला गजाआड केले.
डीझेल रॅकेटचा मुख्य सूत्रधार शब्बीर देशमुख व त्याचा मुलगा मुदस्सर असल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात आणखीही आरोपी वाढण्याची शक्यता आहे. तसेच हे डीझेल कोठून येत होते आणि ते जिल्ह्यात कोठे-कोठे वितरित केले जात होते, याचाही आता पर्दाफाश होणार आहे.
तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या पथकाने नगर शहरातील जीपीओ चौकातील छावणी मंडळाच्या जागेत छापा टाकत 15 दिवसांपूर्वी डीझेल भेसळ उजेडात आणली होती. छाप्यात सुमारे 2 हजार लिटर डीझेल जप्त करत गौतम बेळगे या आरोपीला अटक केली होती. दरम्यान, नंतरची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने राठोड यांची तडकाफडकी बदली करण्यात आली, तसेच या पथकातील सात कर्मचारी व एका पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई पोलीस अधीक्षक पाटील यांनी केली होती.
“त्यांचा’ राष्ट्रवादीशी संबंध नाही : जिल्हाध्यक्ष
<बनावट डीझेल रॅकेटमधील संशयित मुख्य सूत्रधार शब्बीर देशमुख यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी जवळीक असल्याचे मानले जाते. तथापि, त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी काहीच संबंध नसल्याची भूमिका पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दैनिक प्रभातशी बोलताना मांडली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राज्य, जिल्हा अथवा कोणत्याही तालुका संघटनेत देखील ते नाहीत, असे स्पष्टीकरण जिल्हाध्यक्ष फाळके यांनी दिले.
मूळापर्यंत पोचावे लागेल : शिवाजीराव कर्डिले
<आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर बनावट डीझेल व नाफ्ता प्रकरणाचा तपास अवघ्या चार दिवसांत करुन त्यातील संशयित मुख्य सूत्रधार व त्याच्या मुलास अटक झाली. पोलिसांची ही कामगिरी निश्चितच कौतुकास पात्र आहे. त्याबद्दल पोलीस दलाचे विशेष अभिनंदन. परंतु बनावट डीझेल प्रकरणाचे रॅकेट खूप मोठे असल्याचे सरळसरळ दिसते. त्यातही केवळ दोनच व्यक्ती एवढे मोठे रॅकेट चालवू शकत नाहीत, हे देखील उघड आहे. संशयित मुख्य सूत्रधारास राजकीय पाठबळ असल्याचे देखील सर्वांना माहीत आहे. त्यामुळे पोलीस दलाने पुढील तपास करत याच्या मूळापर्यंच पोचण्याची गरज आहे, अशी भूमिका माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दैनिक प्रभातशी बोलताना व्यक्त केली.