व्यवसायासोबत पर्यावरण संवर्धनही

– विष्णू सानप

पिंपरी-चिंचवड येथील प्राधिकरणच्या रहिवासी असलेल्या पुष्पा गुप्ता यांनी केवळ नववीपर्यंत शिक्षण घेतले आहेत. मात्र, वृक्षप्रेमापोटी त्यांनी आज रावेत परिसरात दोन नर्सरी सुरु केल्या आहेत. घराबाहेरील अंगणात आवड म्हणून त्यांनी बाग फुलविली.

मात्र, यातून त्यांच्या मनात विचार आला की, अशा प्रकारची बाग जर प्रत्येक घराबाहेर झाली तर, शहर सुंदर होईल व यातून पर्यावरणाचा ऱ्हासही थांबेल. यामुळेच आपण मोठ्या कष्टातून नर्सरी सुरू केल्या असल्याचे पुष्पा गुप्ता सांगतात. फक्‍त नववीपर्यंतच शिक्षण झाल्याने त्यांना सुरुवातीला इंग्रजी वाचण्यास व बोलण्यास मोठा त्रास झाला. मात्र, वृक्षाच्या प्रेमाने त्यांना सर्वकाही शिकायला भाग पाडले. आज त्या मोबाईल, कॉम्प्युटर सहज हाताळतात. त्यांनी सुरु केलेल्या नर्सरींना शहरातील व शहराबाहेरील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून त्यांना मोठा रोजगारही मिळाला आहे.

नर्सरी हा निव्वळ व्यवसाय नाही. तर, या माध्यमातून पर्यावरणाचे संवर्धन व्हावे हा माझा हेतू असल्याचे गुप्ता सांगतात. माझे शिक्षण जरी कमी झाले असले तरी, मला शिकण्याची आवड आहे. यामुळे मी पर्यावरण विषयक अनेक कार्यशाळेतून प्रशिक्षण घेतले आहे. या माध्यमातून बऱ्याच गोष्टी त्या सातत्याने शिकत असतात.

अनेक दुर्मिळ वनस्पती आणि आयुर्वेदिक वनस्पती संवर्धन करण्याचे काम त्या करतात. याबरोबरच विविध फुलांच्या देशी-विदेशी अशा 250 प्रकारची वृक्ष रोपटे त्यांच्या नर्सरीत बघायला मिळतात. पुष्पा गुप्ता सांगतात की, देशात बऱ्याच अशा वनस्पती आहेत. की, ज्यांच्याद्वारे मोठ-मोठ्या रोगांवर उपचार संभव आहेत. मात्र, याबाबत लोकांना खूप कमी प्रमाणात माहिती आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना रोपटे देण्याबरोबरच त्याचे महत्व सुद्धा सांगण्याचा देखील प्रयत्न असतो, असे पुष्पा गुप्ता यांनी सांगितले.

घराच्या अंगणात फुलवलेल्या बागेमुळे वृक्ष-वल्लींशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. शहरातील प्रत्येक नागरिकांच्या अंगणात सुद्धा अशीच बाग असावी, या उद्देशातून प्राधिकरण येथील रहिवासी असणाऱ्या पुष्पा गुप्ता यांनी आपल्या छोट्या बागेतून सुरुवात करीत आज स्वत:च्या दोन नर्सरी निर्माण केल्या आहेत.

त्यांच्या या नर्सरीला पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून दोन वेळा बेस्ट नर्सरी म्हणून पुरस्कार मिळाला आहे. यातून पर्यावरण विषयक जनजागृती व्हावी व जास्तीत-जास्त लोकांनी वृक्षलागवड करून दिवसेंदिवस ढासळत चाललेले पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा, अशी त्यांनी इच्छा व्यक्‍त केली आहे. याबरोबरच त्या आयुर्वेदिक वनस्पतीचे संवर्धन आपल्या नर्सरीच्या माध्यमातून करीत आहेत.

– पुष्पा गुप्ता

Leave A Reply

Your email address will not be published.