गेल्या सात टर्मपासून आमदार असलेल्या आणि सध्या कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघावर आपली निर्विवाद पकड ठेवली आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांसोबतच पाच महिलांनीदेखील विरोधात लढत दिली.
मात्र तत्कालीन कॉंग्रेसच्या उमेदवार शकुंतला थोरात यांचा अपवाद वगळता एकही महिला त्यांना काट्याची टक्कर देऊ शकली नाही. सर्वांना आपली अनामतदेखील गमवावी लागली.
1985 मध्ये भाऊसाहेब थोरात यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने कॉंग्रेसला या मतदारसंघात उमेदवार शोधण्याची वेळ आली. पक्षाने त्यावेळी आंबेगाव (पुणे) येथील शकुंतला थोरात यांना उमेदवारी दिली. उमेदवार पक्षाने लादल्याची कार्यकर्त्यांची भावना झाली आणि त्यांनी भाऊसाहेब थोरात यांचे पुत्र बाळासाहेब थोरात यांना अपक्ष उमेदवारी करण्यास भाग पाडले.
या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी शकुंतला थोरात यांचा 10 हजार 159 मतांनी पराभव केला. त्यानंतर 1990-प्रा. आशा भांगरे, 2009- ऍड. निशाताई शिवूरकर, सुमन पांडे यांनी अपक्ष म्हणून नशीब अजमावले, 2014 मध्ये सुनीता बेल्हेकर यांनी देखील अपक्ष उभे राहत आपले नशीब अजमावले.