नितीन नांदगावकर यांचा मनसेला रामराम: शिवसेनेत केला प्रवेश

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी मनसेला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हातात शिवबंधन बांधले आहे . एकीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे जाहीर करत असतानाच दुसरीकडे नांदगावकर यांनी पक्षातून बाहेर पडल्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, आपण एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे नांदगावकर म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण राज्यभर भगवा फडकवणार आहोत. तसेच आता शिवसेनेच्या माध्यमातून आपले काम सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी मनसेने विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला होता.

राज ठाकरे यांनी 100 जागांवर मनसे उमेदवार देणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर मनसेच्या आलेल्या उमेदवारांच्या दोन याद्यांमध्ये नांदगावकर यांना वगळण्यात आले होते. त्यामुळेच त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

मनसेच्या खळ्ळ खट्याक स्टाईलमुळे नितीन नांदगावकर हे चर्चेत आले होते. त्यांनी आपल्या माध्यमातून अनेकांना न्यायही मिळवून दिला होता. नुकतेच त्यांनी मुंबईतील टॅक्‍सी चालकांविरोधात आंदोलन पुकारले होते. टॅक्‍सींमध्ये बटन लावून प्रवाशांच्या होणाऱ्या फसवणुकीबद्दल त्यांनी आवाज उठवला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.