अकोले -सानुग्रह अनुदान, बोनस व पगारवाढीचा दुसरा हप्ता दिवाळीपूर्वी देण्यात यावा, या मागणीसाठी वीज कंपनीतील वीज कामगार महासंघासह इतर प्रमुख संघटनाबरोबर बावीस संघटनानी एकत्र येऊन शनिवारी (दि.14) संपाचा इशारा दिला आहे, अशी माहिती वीज कामगार महासंघाचे जिल्हा सचिव गणेश कुंभारे यांनी दिली.
वीज मंडळातील कामगार, अभियंते, अधिकारी यांच्या कार्यरत असणाऱ्या सर्व संघटनांनी सर्व कर्मचाऱ्यांना नेहमीच्या परंपरेनुसार दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान, बोनस व पगारवाढीचा दुसरा हप्ता यांचे वेतन अदा करण्याची मागणी एका पत्रानुसार पाच नोव्हेंबर रोजी केली होती.
मात्र, वीज मंडळ प्रशासनाने त्याची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे सर्व संघटना नाराज होऊन दिवाळीपूर्वी रक्कम अदा न केल्यास शनिवारी सर्व कर्मचारी, अभियंते,अधिकारी व सर्व संघटनांचे सभासद संप करतील असा इशारा वीज प्रशासनाला दिला आहे. ऐन दिवाळीत वीज मंडळातील सर्व संघटना एकत्र येऊन संपाचा इशारा दिल्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी महराष्ट्रात अंधार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वीजमंडळ प्रशासन यावर काय कार्यवाही करते, याकडे सर्व वीज कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत.