Sanjay Raut on Election Commission| लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. एकीकडे असे चित्र असतानाच लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ डिसेंबर 2027 पर्यंत होता. त्यांनी पदाचा राजीनामा का दिला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी तत्काळ प्रभावाने त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. या संपूर्ण घटनेवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत चुनाव आयोगाला ‘भाजपाचा चुना लगाव’ आयोग म्हंटले आहे.
काय म्हणाले संजय राऊत? Sanjay Raut on Election Commission|
निवडणूक आयुक्तांचा तडकाफडकी राजीनामा हा मोदी-शाहांचा नवीन डाव असेल, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. “निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांचा राजीनामा हा नैतिकतेच्या मुद्द्यावर दिलेला राजीनामा नाही. मूळात ती नेमणूकच अनैतिक होती. अशी व्यक्ती नैतिक कारणासाठी कशाला राजीनामा देईल. ज्यांनी नेमलं त्यांनीच त्यांना दूर केलं. आता त्याजागी आणखी एका व्यक्तीची नियुक्ती केली जाईल. ते आता भाजपाचीच विस्तारित शाखा म्हणून काम करत असल्याचे वाटते. चुनाव आयोग हा सध्या भाजपाचा चुना लगाव आयोग झाला आहे,” असा टोला संजय राऊत यांनी भाजपाला लगावला.
पुढे ते म्हणाले, “निवडणूक आयोग हा भाजपाच्या वरिष्ठ नेतेमंडळींच्या आदेशानुसारच काम करत आहे. हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल दिल्या गेलेल्या निर्णयांवरून स्पष्ट झाले आहे. पक्षांतरविरोधी कायद्याची मोडतोड करून आयोगाला काही निर्णय घ्यायला लावले. तेव्हा भाजपाच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने धृतराष्ट्र बनून काम केले. निवडणूक आयुक्तांचा तडकाफडकी राजीनामा हा काही तरी मोदी-शाहांचा नवीन डाव असेल,” असेही ते म्हणाले. Sanjay Raut on Election Commission|
दरम्यान, गोयल यांच्या राजीनाम्यानंतर आता निवडणूक आयोगात फक्त मुख्य निवडणूक आयुक्त उरले आहेत. आता आयोगात दोन निवडणूक आयुक्तांची पदे रिक्त झाली आहेत. अनुप चंद्र पांडे गेल्या महिन्यात निवृत्त झाल्यामुळे आयोगातील एक पद रिक्त होते. पण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर आता निवडणूक आयोगात दोन आयुक्तांची पदे रिक्त झाली आहेत.
आता फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हेच या आयोगात असून ते तीन सदस्यीय ECI पॅनेलमध्ये आहेत. दरम्यान, गोयल, निवृत्त नोकरशहा, पंजाब केडरचे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
हेही वाचा:
बहीण-भावाचा अबोला कायम! सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ मागणीवर अजित पवारांचे भाषणातून प्रत्युत्तर