मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने शिंदे-भाजप सरकारमधील काही आमदार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सुरुवातीला अजित पवारांमुळे शिंदे गटाचे आमदार नाराज असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता भाजप आमदार आपल्याकडे नाराजी व्यक्त करत आहेत, असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे हे माध्यमांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी हा दावा केला आहे. भाजपाचे अनेक आमदार नाराज असल्याचा दावा करत खडसेंनी भाजपा आमदार माझ्याशी बोलताना या निर्णयामुळे नाखूश असल्याचेही यावेळी नमूद केले.
पुढे एकनाथ खडसे यांनी, “शिंदे गटाचे अनेक आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून मंत्रीपदासाठी उभे आहेत. अनेक आमदार स्वतःहून सांगत आहेत की, मी मंत्री होणार आहे, मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला. काही म्हणत आहेत की, मी मंत्री होणार, मी पालकमंत्री होणार आहे. अशास्थितीत प्रत्येकजण मंत्रीपदासाठी इच्छूक आहे.” असे सांगितले.
त्यासोबतच “ज्यावेळी मंत्रीमंडळ विस्तार होईल, खातेवाटप होईल तेव्हा मोठ्या प्रमाणावर नाराजी उफाळणार आहे. आज भाजपाच्या आमदारांमध्येही नाराजी आहे. भाजपा आमदारांमध्ये नाराजी आहे, फक्त शिंदे गटाप्रमाणे बाहेर बोलत नाहीत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेतल्याने भाजपाचे अनेक आमदार नाराजी व्यक्त करत आहेत,” असा दावा एकनाथ खडसेंनी केला. दरम्यान,“भाजपा आमदार माझ्याशी बोलताना या निर्णयामुळे नाखूश असल्याचं मलाही सांगतात. त्यामुळे याचा परिणाम आज नाही, उद्या होईल, मात्र निश्चित होईल. तो परिणाम या पक्षांसाठी अनुकुल नसेल,” असा इशारा एकनाथ खडसेंनी दिला.