-वंदना बर्वे
सध्या दोन भारतीयांची जगात चर्चा आहे. यातील पहिली व्यक्ती म्हणजे कमला हॅरिस आणि दुसरे म्हणजे शिरीष दाते. अमेरिकेच्या निवडणुकीत उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी आपली नेतृत्व क्षमता सिद्ध केली आहे, तर शिरीष दाते यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडविणारा प्रश्न विचारून निडर, निर्भिड आणि धाडसी वृत्तीचं दर्शन घडविलं आहे.
करोनानं अख्ख्या जगात थैमान घातले असले तरी अमेरिकेत सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. डेमोक्रेटिक या राजकीय पक्षाने ज्यो बिडेन यांना राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार बनविले आहे. तर, भारतीय वशांच्या कमला हॅरिस यांना उपराष्ट्रपतिपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे कमला हॅरिस यांची भारतात खूप चर्चा सुरू आहे.
कमला हॅरिस केवळ भारतीय वशांच्या आहेत म्हणून त्यांची चर्चा सुरू आहे असं अजिबात नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर टीका करण्यात त्यांनी किंचितही संकोच केला नाही. काश्मीरमधून कलम 370 आणि 35 अ हटविण्यात आले आणि अनेक निर्बंध लादण्यात आले, तेव्हा या कारवाईविरुद्ध त्यांनी सरकारचा समाचार घेतला होता.
कलम 370 हटविल्यानंतर जगात या निर्णयाची बरीच चर्चा झाली. येथील अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. यावर हॅरिस यांनी स्पष्ट मत व्यक्त केले होते. टेक्सासच्या ह्युस्टनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, काश्मीरच्या जनतेनं
स्वतःला एकटं समजू नये. आमचं त्यांच्यावर बारीक लक्ष आहे आणि मानवाधिकाराचे उल्लंघन होत असेल तर त्याविरुद्ध बोलत राहणं आणि मध्यस्थी करण्यात आम्ही मागेपुढे पाहणार नाही. एक देश म्हणून हा आमच्या मूल्यांचा एक भाग आहे. याशिवाय, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारतीय वंशाच्या अमेरिकन खासदार प्रमिला जयपाल यांची भेट घेतली नव्हती. याचाही कमला हॅरिस यांनी खरपूस समाचार घेतला होता.
अमेरिकेतील भारतीयांचे मत मिळविण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. तर, मोदी यांनीसुद्धा ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष व्हावे म्हणून भारतीय मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत भारतीयांचा जंगी कार्यक्रम घेतला होता. यात ट्रम्प हेही आले होते. एवढंच काय तर, ट्रम्प अलिकडेच भारतात येऊन गेले. आधी ते गुजरातमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला गेले आणि नंतर देशाच्या राजधानीत आले. हा सगळा खटाटोप अमेरिकेची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून केला गेला आहे, हे येथे उल्लेखनीय.
अमेरिका जर सीरिया, लेबनॉन या देशांविषयी बोलत असेल तर भारतातल्या मानवी हक्कांबाबतही बोलावं लागेल. मात्र, यात अमेरिकेच्या सरकारने घुमजाव केले आहे. अमेरिकेतील आठ राज्यांमध्ये भारतीय आणि भारतीय वंशाची मते निर्णायक भूमिकेत आहेत. यामुळे ही मते मिळविण्यासाठी रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे. यासाठी काश्मीर आणि एनआरसीसारख्या मुद्द्यांचा वापर जोरात होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे काश्मीर, एनआरसी, दंगल यासारख्या मुद्द्यांना हवा दिली तर केवळ भारतीयांचीच मते प्रभावित होत नाहीत तर पाकिस्तानी अमेरिकनही प्रभावित होतात. यामुळे हे मुद्दे निर्णायक झाले आहेत. म्हणूनच भारतीय आणि पाकिस्तानी अमेरिकन्सना आकर्षित करण्यासाठी ज्यो बिडेन कॅम्पने 14 आणि 15 ऑगस्टला व्हर्च्युअल इव्हेंट्सही ठेवले होते.
भारतीय अमेरिकन्सची मत आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळतील अशी आशा ट्रम्प यांच्या कॅम्पेनलाही आहे. ट्रम्प व्हिक्टरी इंडियन अमेरिकन फायनान्स कमिटीच्या अंदाजानुसार सुमारे 50 टक्के संभाव्य भारतीय अमेरिकन मतदार हे डेमोक्रॅट्सना सोडतील आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासाठी मतदान करतील.
हॅरिस यांच्या आईचा जन्म भारतात झाला होता आणि आपल्या भारतीय वारसाबद्दल त्या कायम बोलत असतात. हॅरिस सध्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आहेत. हे पद प्रतिकात्मक असते. सगळी सूत्रे राष्ट्राध्यक्षाच्या हातात असतात. हॅरिस यांनी अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठात 4 वर्षं शिक्षण घेतल्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधून कायद्याची पदवी घेतली आणि अल्मेडा काउंटीच्या डिस्ट्रिक्ट ऍटर्नी कार्यालयापासून करिअरला सुरुवात केली. 2003 साली त्या सॅन फ्रान्सिस्कोच्या डिस्ट्रिक्ट ऍटर्नी बनल्या. कॅलिफोर्नियाच्या ऍटर्नी जनरल म्हणून निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि पहिल्या कृष्णवर्णीय व्यक्ती. 2017 साली त्यांची निवड कॅलिफोर्नियाच्या ज्युनियर यूएस सिनेटर म्हणून झाली. अमेरिकेच्या सिनेटमध्ये त्यांनी महत्त्वाच्या चर्चांदरम्यान त्यांच्या संभाषण कौशल्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.
चर्चेत असलेले दुसरं नाव म्हणजे शिरीष दाते. दाते यांचा जन्म 1964 मध्ये पुण्यात झाला. ते 3 वर्षांचे असताना त्यांचे आईवडील अमेरिकेत स्थायिक झाले होते. हफिंग्टन पोस्ट या इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये ते ज्येष्ठ पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते व्हाइट हाउस करसपॉंडंट म्हणून कार्यरत आहेत. अर्थात, व्हाइट हाउसच्या घडामोडींची ते वार्तांकन करतात.
अमेरिकेच्या व्हाइट हाउसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दाते यांनी विचारलेल्या थेट प्रश्नामुळे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. याच कारणामुळे त्यांची जगभरात चर्चा आहे. “तुम्हाला अमेरिकन लोकांना खोटं सांगितल्याचा खेद वाटतो का,’ असा थेट सवाल त्यांनी ट्रम्प यांना केला.
सुरुवातीला नेमका प्रश्न काय होता? हे लक्षात न आल्यामुळे ट्रम्प यांनी पुन्हा प्रश्न विचारण्यास सांगितले. दाते यांनी प्रश्नाचं स्वरूप लहान करीत विचारले, सगळ्या खोट्या गोष्टी, असत्य… जे तुम्ही सांगितलं. ट्रम्प या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून थेट पुढच्या प्रश्नावर गेले. पण हा प्रश्न विचारणारे दाते यांची चर्चा सुरू झाली. दाते यांनी विचारलेल्या या प्रश्नाचं काहीजण कौतुक करीत आहेत तर काहीजण टीका.