चेन्नई – माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व सुरेश रैना यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनी निवृत्तीचा निर्णय का घेतला याचा खुलासा सोमवारी रैनाने केला. धोनीच्या जर्सीचा क्रमांक 7 तर माझा 3 आहे. त्यातच 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे पूर्ण झाली, म्हणूनच हा योग साधून आम्ही निवृत्ती घेतली, असे रैनाने सांगितले. तसेच हा निर्णय आम्ही खूप आधीच घेतला होता, अशी पुष्टीही त्याने जोडली.
धोनी पाठोपाठ रैनाने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. हा निर्णय जाहीर करण्यासाठी त्यांनी 15 ऑगस्ट हा दिवस का निवडला याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली होती. धोनीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले व लगेचच रैनानेही धोनीला शुभेच्छा देत मी देखील तुझ्याबरोबर चालायचे ठरवले आहे, अशी पोस्ट करत निवृत्ती जाहीर केली. 15 ऑगस्टलाच निवृत्ती का घेतली? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात होता, त्याचा खुलासा रैनाने केला आहे.
आम्ही दोघांनी आधीपासूनच याच दिवशी निवृत्ती घेण्याचे निश्चित केले होते. धोनीचा जर्सी क्रमांक 7 व माझ्या जर्सीचा क्रमांक 3 आहे. दोन्ही मिळून 73 होतात. तसेच शनिवारी भारताला स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे पूर्ण झाली. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्यासाठी या दिवसाची निवड केली.
धोनी व रैना यांना भारतीय क्रिकेटमध्ये जय-विरू असे संबोधले जाते. या दोघांची मैत्री इतकी घट्ट आहे की, ते एकमेकांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नव्हते. धोनीनेही कर्णधार असताना रैनाला अनेकदा संधी दिली होती. त्यावरून धोनीला टीकेचाही सामना करावा लागला होता. सातत्याने अपयश येत असल्याने रैनाला संघातील स्थान गमवावे लागले. मात्र, तरीही त्यांच्या मैत्रीत कधीही कटुता दिसून आली नाही. या दोघांच्या मैत्रीवरून युवराजसिंगने अनेकदा माध्यमांमध्ये टीका केली होती. केवळ मीत्र असल्यानेच धोनीने माझ्या ऐवजी रैनाला जास्त संधी दिली, अशी टीकाही युवराजने अनेकदा केली. मात्र, क्रिकेट चाहत्यांनी यांच्या मैत्रीला तसेच एकत्रित निवृत्तीच्या निर्णयाचे स्वागत केले.
असाही योगायोग …
धोनी व रैना यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वाटचालीत खूप साम्य आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीत या दोघांनाही पदार्पणाच्या सामन्यात धावांचा भोपळाही फोडता आला नव्हता. हे दोघे जानी दोस्त 2011 सालच्या विश्वकरंडक विजेतेपद मिळवलेल्या संघात होते. तसेच हे दोघे आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज या एकाच संघातून खेळतात.