सिरो सर्वेक्षणाचा पुणेकरांना दिलासा : तीन आठवड्यांत नियंत्रणात येण्याचा अंदाज
पुणे – शहरात करोनाचा सुरुवातीला संसर्ग वाढलेल्या येरवडा, कसबापेठ, रास्तापेठ, लोहियानगर आणि नवी पेठ याच प्रभागांमध्ये निम्म्याहून अधिक लोकांना करोनाचा संसर्ग होऊन गेला. मात्र, याची पुसटशी जाणीवसुद्धा त्यांना झाली नाही. याचाच अर्थ निम्म्या पुणेकरांना करोनाची बाधा होऊन गेली असून, त्यांना ती कळलीच नाही आणि त्यातून ते बरेदेखील झाले आहेत, असा अंदाज सिरो सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. या पाच प्रभागांतील सर्व वयोगटातील नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. त्यात 51.5 टक्के जणांच्या रक्तात “करोना सार्स 2 ऍन्टीबॉडिज’ आढळल्या आहेत.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी आयसरचे प्रा. शशीधर, डॉ. अर्णब घोष, पुणे विद्यापीठाच्या डॉ. आरती नगरकर, आदी यावेळी उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (आयआयएसईआर), ट्रान्सलेशनल हेल्थ आणि तंत्रज्ञान संस्था, फरिदाबाद येथील सायन्सेस ऍड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालय वेल्लोर मधील संशोधक, वैज्ञानिक आणि साथरोग तज्ज्ञ यांनी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत करोनाचा फैलाव जास्त झालेल्या कार्यक्षेत्रात सिरो सर्वे केला.
सर्वेक्षणासाठी प्रसिस्टन्ट फाऊंडेशनने निधी दिला आहे. करोना बाधितांची संख्या जास्त असलेल्या कार्यक्षेत्रात सार्स कोविड-2 या विषाणू विरुद्धच्या तयार होणाऱ्या ऍन्टिबॉडीज अर्थात “सेरोप्रिव्हेलेन्स’च्या व्याप्तीचा अंदाज घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले.
असे केले सर्वेक्षण
दि. 1 जून 2020 पर्यंत पुणे महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागातील करोना बाधितांची संख्या विचारात घेता अभ्यासासाठी या पाच प्रभागांची निवड करण्यात आली. ह्या अभ्यासात सार्स कोविड-2 विरुद्ध तयार होणाऱ्या प्रतिजैविके अर्थात ऍन्टिबॉडीजचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाच्या आराखड्यानुसार सहभागी होण्यास संमती देणाऱ्या 1 हजार 664 व्यक्तींचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. हा अभ्यास दि. 20 जुलै ते दि.5 ऑगस्टदरम्यान करण्यात आला. या अभ्यासात घेतलेल्या रक्ताचे नमुन्यांची आयजीजी ऍन्टिबॉडीज तपासण्याची चाचणी केली.
ऍन्टिबॉडीज होण्याचे प्रमाण 65.4 %
या पाच प्रभागांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. येथील सर्वेक्षणात ऍन्टिबॉडीज तयार होण्याची टक्केवारी ही 36.1 टक्के ते 65.4 टक्क्यांपर्यंत आढळली आहे आणि ते प्रमाण सर्व प्रकारच्या निवासस्थानांमध्ये आहे. स्वतंत्र शौचालये असणाऱ्या घरांमधील प्रसार 43.9, तर सार्वजनिक शौचालये वापरणाऱ्यांमध्ये हे प्रमाण 62.2 टक्के आहे.
या सिरो सर्वे अहवालाचे महत्त्व खूप आहे. यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय आराखडा तयार केला पाहिजे. काय योजना करणे आवश्यक आहे. कोणत्या बाबींवर अधिक लक्ष दिले पाहिजे, कार्यपद्धत कशी असली पाहिजे हे निश्चित करणे सोपे जाणार आहे.
– सौरभ राव, विभागीय आयुक्त, पुणे