डॉ. येळगावकर, अनिल देसाईंचं बिघडलं गणित

एका दगडात अनेक पक्षी टिपण्याचे मनसुबे धुळीला
सातारा  – माण विधानसभा मतदारसंघात “आमचं ठरलंय’ टीमकडून उमेदवारी अंतिम झाल्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींमध्ये एका दगडात अनेक पक्षी टिपण्याचे मनसुबे आखणाऱ्या माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर व अनिल देसाई या भाजपच्या दोन नेत्यांमधील गणित बिघडल्याचे दिसत आहे.

जयकुमार गोरे यांना विरोध करून गेली दोन वर्षे तालुक्‍यात एकी करण्याचे काम विरोधकांकडून सुरू होते. तयारी पूर्ण झाली आणि येळगावकर व देसाई यांनी विरोध करूनही जयकुमार गोरेंना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यामुळे दोघांची गोची झालीच; पण पुढील मनसुबेही धुळीला मिळण्याची शक्‍यता आहे.

प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे, अनिल देसाई, डॉ. संदीप पोळ, रणजित देशमुख, डॉ. दिलीप येळगावकर, सुरेंद्र गुदगे हे शिलेदार जयकुमार गोरे हटाव मोहिमेत सहभागी झाले आणि या कामाला वेगही आला. वरकरणी “जयकुमार गोरे हटाव’चा नारा असला तरी प्रत्येकाचे दुखणे वेगवेगळे होते. त्यामुळे “आमचं ठरलंय’ ही सर्वपक्षीय आघाडी किती काळ टिकेल, याबाबत पहिल्यापासूनच शंका उपस्थित केली जात होती.

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. मतदारसंघात “जयकुमार हटाव’चे वातावरण तयार करण्यात या नेतेमंडळींना काही प्रमाणात यश आले तरी सगळेच म्हणत होते की “आमचं ठरलंय’. मात्र, नक्‍की काय ठरलंय याची जनतेला उत्सुकता होती. साताऱ्यात ओढूनताणून पत्रकार परिषद घेत अनिल देसाईंचे नाव ठरवल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यावेळी प्रभाकर देशमुख यांच्या देहबोलीवरून ते नाराज असल्याचे वाटत होते.

अखेर ते खरेही ठरले. “आमचं ठरलंय’मधून अनिल देसाईंचे नाव अंतिम झाले असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपला मोहरा रिंगणात उतरवल्याने चौरंगी लढत होईल, असे वाटत होते. मात्र, साताऱ्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत बारामतीच्या थोरल्या साहेबांनी अशी काही जादू केली की, स्वाभिमानीच्या संदीप मांडवेंनी राजू शेट्टींच्या आदेशाने माघार घेतली. “आमचं ठरलंय’मधून प्रभाकर देशमुखच हेच चलनी नाणे ठरले. या सगळ्यात एका दगडात दोन पक्षी मारण्याचे मनसुबे आखलेल्या डॉ. दिलीप येळगावकर, अनिल देसाई यांना धोबीपछाड मिळाली. कारण या दोघांनी भाजपमध्ये आलेल्या जयकुमार गोरेंच्या पाडावाची तयारी केली होती.

अनिल देसाईंना आमदार करून पुन्हा एक आमदार भाजपच्या गोटात सामील करायचा होताच; पण हे करताना माण मतदारसंघात जयकुमार गोरेंचा करिष्मा नसल्याचे दाखवून द्यायचे होते. दुसऱ्या बाजूला पक्षात स्वत:चे वजनही वाढवायचे होते. मात्र, येळगावकर, देसाई यांचे गणित बिघडल्याचे दिसत आहे. त्यामुळे देसाई यांनी पक्षशिस्तीचे कारण सांगत जयकुमार गोरेंचे काम केले अन्‌ येळगावकरांनी माणमध्ये तटस्थ राहून जिल्ह्यातील इतर मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केल्यास नवल वाटायला नको.

 

गद्दार, शिखंडी शब्दांचा वापर
“तुझ्या गळा, माझ्या गळा’ म्हणत विजयाची गणिते मांडणारे “आमचं ठरलंय’ टीममधील नेते अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या डावपेचांमुळे चवताळले आहेत. सध्या सोशल मीडियावर “माण तालुक्‍याचा गद्दार, शिखंडी’ हे शब्द परवलीचे झाले आहेत. अनिल देसाई व डॉ. येळगावकर यांनी कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्याची जाहीर केल्याने गद्दार कोण अन्‌ शिखंडी कोण, हे पाहावे लाणार आहे.

स्वाभिमानीची माघार अटीवर
काही झाले तरी निवडणूक लढवणार, अशी गर्जना करणाऱ्या संदीप मांडवे यांनी राजू शेट्टींच्या आदेशाने माघार घेतली. त्याबद्दल स्वाभिमानीचे प्रदेश प्रवक्ते अनिल पवार म्हणाले, जयकुमार गोरेंच्या पाडावासाठी सर्वानुमते एकमत होईल अन्‌ मतदारसंघात नव्या पर्वाची लाट निर्माण होईल या अटीवर माघार घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.