कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी 160 जागा जिंकेल : थोरात

पुणे -“कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस थकली आहे’ हे सुशीलकुमार शिंदे यांनी केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक मत असून, कॉंग्रेस जोमाने प्रचाराला लागली आहे. आघाडी राज्यात 160 जागा जिंकेल, असा दावा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी केला.

कॉंग्रेस भवन येथील पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत, माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, रमेश बागवे, गोपाळ तिवारी, सत्यजित तांबे, अमीर शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते. पूर आला त्यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री तेथे नव्हते. पुण्यातही पूर आला त्यावेळीही पालकमंत्री शहरात नव्हते. त्यामुळे व्यवस्थापनात अडचणी येऊन मृतांची संख्या वाढली आणि नुकसानही मोठ्याप्रमाणावर झाले. पूरग्रस्तांचे पंचनामे झाले नसून, त्यांना नुकसान भरपाईदेखील मिळालेली नाही. केंद्राकडून 6 हजार 800 कोटी रुपयांचे पॅकेज आणणार, अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तरी त्यातील एक छदामही मिळाला नाही. हे केवळ बोलघेवड्यांचे सरकार असून, त्यांना जनतेशी देणेघेणे नाही, अशी बोचरी टीका थोरात यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.

ओबीसी समाजासाठी सरकारने फार काम केले आहे, असे सांगणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ओबीसी समाजासाठी नेमके काय काम केले? हे जाहीर करावे. आरक्षणाच्या नावाखाली भाजपने सर्व समाजांची फसवणूक केली आहे. त्यांचे मित्र पक्षच त्याची जाहीर कबुली देत आहेत. विकास कामांच्या बाबतीतही केवळ खोटे बोल पण रेटून बोलणाऱ्या सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे, असा आरोपही थोरात यांनी केला. या सरकारने धनगर समाजाचीही फसवणूक केली असून, खुद्द रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनाही ते माहिती आहे. तरीही सत्तेसाठी ते भाजपबरोबर आहेत, असे बोलून थोरात यांनी जानकर यांच्यावर निशाणा साधला. तर, ठाकरे यांची टीका फारशी गांभीर्याने घेण्याची बाब नाही. आमचा पक्ष संपणार नाही, तो वाढणारच आहे.

पुण्यातील सभांचे वेळापत्रकच माहिती नाही
कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचाराला पुण्यात अद्याप कोणत्याच नेत्यांनी वेळ दिला नाही. निवडणूक महाराष्ट्रात आहे त्यामुळे अन्य ठिकाणच्या केंद्रीय स्तरावरील नेत्यांनी प्रचारासाठी येणे अपेक्षित होते. यावर विचारले असता थोरात म्हणाले, की “स्टार प्रचारकांची यादी पक्षाच्या वेबसाइटवर पडली आहे. परंतु अद्याप त्यांचे वेळापत्रक आले नाही. उद्यापासून प्रचारला खरी सुरूवात होणार आहे. त्यामुळे नेतेमंडळी प्रचारासाठी येतील.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.