श्रीगोंद्यात डॉ. विखे यांना 32 हजारांचे मताधिक्‍य

संग्रहित छायाचित्र

अर्शद आ. शेख
लोकसभेचा निकाल विधानसभा निवडणुकीचे समीकरण बदलणार?
माजी मंत्री पाचपुते यांनी सर्व ताकद विखेंच्या पाठीशी

श्रीगोंदा – लोकसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे श्रीगोंदा तालुक्‍यातून डॉ. सुजय विखे यांना सुमारे 32 हजारांचे मताधिक्‍य मिळाल्याने भाजप समर्थकांना गगन ठेंगणे झाले आहे. चार महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर या निकालाचा काय परिणाम होणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. डॉ. विखे यांची उमेदवारी जाहीर होण्या पूर्वीपासून त्यांनी लोकसभा लढवायची, या इर्षेने तयारी सुरू केली. राष्ट्रवादीला उमेदवार घोषित करायला मुहूर्त सापडत नव्हता. कॉंग्रेसच्या अनुराधा नागवडे यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे करण्याची जोरदार तयारी झाली. मग तेही नाव मागे पडले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसरीकडे विखे यांचा पक्ष निश्‍चित नव्हता. मात्र निवडणूक लढविणारा चेहरा म्हणून ते मतदार संघ पिंजत होते. निवडणूक प्रचार यंत्रणा ते स्वतंत्रपणे राबवित होते. तालुक्‍यातून त्यांना जुन्या कॉंग्रेस समर्थकांनी साथ दिलीच. शिवाय माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी त्यांची सर्व ताकद विखे यांच्या पाठीशी उभी केली. त्याचा विखेंना मोठा फायदा झाला. राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांची जन्मभूमी श्रीगोंदा तालुका आहे. त्या तुलनेने ते श्रीगोंदेकरांसाठी घरचे उमेदवार होते. विखे हे बाहेरचे असूनही तालुक्‍याने त्यांना स्वीकारले. शिवाय राष्ट्रवादीचा मायभूमीतील उमेदवार असताना त्यास अव्हेरले.

निवडणूक प्रचार काळात कुकडीच्या पाण्यावर रणकंदन झाले. साकळाई योजनेची खूप चर्चा झाली. कुकडी-घोडच्या पाण्यावरून पुणे जिल्ह्यातील नेत्यांशी संघर्षाचा पवित्रा विखे यांनी घेतला. तो मतदारांना भावला. आमदार राहुल जगताप, कॉंग्रेस नेते राजेंद्र नागवडे यांचा एकत्रित प्रचार केला. त्यांना शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या घनश्‍याम शेलार यांनी साथ व स्थानिक उमेदवार, असे असताना देखील आ. संग्राम जगताप यांना पिछाडीवर का जावे लागले? याचे आत्मचिंतन कॉंग्रेस -राष्ट्रवादीला करावे लागेल.

या पूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत तालुक्‍यातून मिळालेल्या मताधिक्‍यानुसार विधानसभा निवडणुकीत मतांची आघाडी राहिलेली नव्हती. या निकालातून मात्र भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. कारण देशात मोदी लाट कायम आहे.वरकरणी वातावरण विरोधात दिसले, तरी मतदान यंत्रणेतून वेगळेच चित्र बाहेर येते, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. ही बाब भाजप विशेषतः पाचपुते समर्थकांचा हुरूप वाढविणारी असेल. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपचे पाचपुते तेरा हजार मतांनी मागे होते. सध्या विखे व भाजपच्या अभूतपूर्व यशाने भाजप-सेनेचे बळ तालुक्‍यात वाढणार, असे दिसते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विधानसभा निवडणुकी पर्यंत मोदी लाट टिकून राहते की नाही ? यावर बरेच काही अवलंबून असेल.

अनुराधा नागवडे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत देऊन आमदार जगताप यांच्या पुढे नवे संकट उभे केले आहे. आगामी काही महिने श्रीगोंद्याचा राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची चिन्हे आहेत. एकूणच मरगळ आलेल्या भाजप समर्थकांना या विजयाने प्राणवायू मिळाला आहे, तर विरोधी गटाला एकप्रकारे धोक्‍याचा इशारा पण आहे. निवडणुकीच्या शेवटी तर विखे यांच्या प्रचार यंत्रणेतील प्रमुख कार्यकर्ते निवडणूक आयोगाच्या नोटिशीमुळे येथून निघून गेले होते. स्थानिक कायकर्ते व त्यांना दिली जाणारी रसद शेवटच्या क्षणी विखे देऊ शकले नाहीत. विरोधी नेत्यांचे ऐक्‍य, त्याला बारामतीमधून मिळणारी रसद व मार्गदर्शन या उपरही तालुक्‍यातून विखे व पाचपुते यांनी एकछत्री अंमल दाखवीत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले, हे वास्तव नाकारता येणार नाही. आगामी विधानसभेचे समीकरण बदलविणारा हा निकाल आहे, हे निश्‍चित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)