Dr Shahnaz Ganai – नॅशनल कॉन्फरन्सच्या माजी आमदार डॉ. शहनाज गनई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले.
यादरम्यान पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि जम्मू-काश्मीरचे पक्ष प्रभारी तरुण चुग, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि राष्ट्रीय प्रवक्ते सय्यद जफर इस्लाम यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी शहनाज गनई यांचा भाजपमध्ये प्रवेश नॅशनल कॉन्फरन्ससाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्या नॅशनल कॉन्फरन्सच्या माजी आमदार आहेत. त्या जम्मू विभागातील पुंछ जिल्ह्यातील रहिवासी आहे.
शहनाज या नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गुलाम अहमद गनई यांच्या कन्या आहेत. पीर पंजाल भागात त्यांची पकड आहे.
शहनाज गनई यांनी २०१९ मध्ये एनसीचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून त्या अनेकदा मोदी सरकारच्या योजनांच्या बाजूने उभ्या राहिल्या आणि सातत्याने त्यांनी मोदी सरकारचे कौतुक केले.
भाजपमध्ये प्रवेश करताना शहनाज गनई म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक प्रयत्नांमुळे त्यांना पक्षात येण्याची प्रेरणा मिळाली. जम्मू आणि काश्मीर क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे कारण शांतता आणि विकास कार्यांना नवीन गती मिळाली आहे.