पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णांची संख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे. बारामती पॅटर्न नुसार कडक निर्बंध पाळून येथील रुग्णसंख्येला आळा घाला, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने सूक्ष्म नियोजन आणि सर्व उपाययोजना राबवून करोनाचा फैलाव थांबवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील करोनाबाधितांची संख्या व मृत्यू दर कमी करणे गरजेचे आहे. असे सांगत पवार म्हणाले, महानगरपालिकांतर्गत असणाऱ्या हॉटस्पॉटनिहाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवावी. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा यासाठी सहभाग घ्यावा. संबंधित अधिकाऱ्यांनी त्या-त्या भागातील रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी काटेकोर नियोजन करुन त्यानुसार समन्वय ठेवून अंमलबजावणी करावी. तसेच अति संवेदनशील भागात टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे. त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून झोपडपट्टी परिसरात तपासणी वाढवून स्वच्छतेवर भर द्यावा. मास्क, सॅनिटायझरचे वाटप लवकर करा.
कंटेंटमेंट भागातील नागरिक अन्य भागात ये-जा करू नयेत याची खबरदारी घ्यावी. शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात राहण्यासाठी झोपडपट्टी भागातील कुटुंबीयांचे संस्थात्मक क्वारंटाइन करावे. नागरिकांनीही सामाजिक अंतर पाळणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, अशा सूचनांचे पालन गरजेचे आहे. सद्यपरिस्थितीत घालून दिलेले निर्बंध पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री यांनी केले.
काही ठिकाणी उद्योग सुरू करण्याचा विचार
पुणे, पिंपरी-चिंचवड, मालेगाव, औरंगाबाद अशी जास्त रुग्ण संख्या असणारी शहरे वगळून अन्य ठिकाणी उद्योग सुरू करण्याबाबत राज्य शासन विचाराधीन आहे. येथील ग्रामीण भागातील कारखानदारी सुरू करण्यासाठी नियोजन करावे. यासाठी आवश्यक नियम आणि सामाजिक शिष्टाचाराचे पालन करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर शहरी भागातील कंटेन्मेंट भाग वगळता अन्य भागातील कारखानदारी बाबतही नियोजन करावे. निवारागृहात असलेल्या कामगारांना चोख सोयी-सुविधा पुरवाव्यात तसेच परराज्यांतील मजूर, कामगारांच्या स्थलांतराबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय साधून कार्यवाही करावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.