पिंपरी, (प्रतिनिधी) – वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) करप्रणालीच्या कायदेशीर अडचणींमध्ये वाढ झाल्यामुळे महत्त्वपूर्ण बदल घडून आले आहेत. त्याअनुषंगाने जीएसटी खटल्यातील आव्हाने आणि गुंतागुंतीच्या निराकरणासाठी पिंपरी चिंचवड आकुर्डी चॅप्टर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीने चिंचवड येथील ऑटोक्लस्टर येथे “जीएसटी लिटिगेशन मास्टरक्लास – नेव्हिगेटिंग जीएसटीएटी आणि लीगल मॅनेजमेंट इनसाइट्स” या चर्चासत्राचे आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जीएसटी (इंटेलिजन्स) सहसंचालक अभासिंह फाळके, यश प्रभा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अमित घैसास, एमटीपीएचे अध्यक्ष सीएमए श्रीपाद बेदरकर, आयसीएमएआयचे माजी अध्यक्ष सीएमए ब्रिजमोहन शर्मा, आयसीएमएआय केंद्रीय परिषद सदस्य सीएमए हर्षद देशपांडे, आयसीएमएआयच्या वेस्टर्न इंडिया रीजनल कौन्सिल सदस्यचे महेंद्र भोंबे, पिंपरी चिंचवड आकुर्डी चॅप्टरचे (पीसीए) अध्यक्ष सीएमए सागर मालपुरे, पीसीए चॅप्टरचे उपाध्यक्ष अजित शिंदे यांच्या हस्ते झाले.
सीएमए डॉ. शैलेंद्र सक्सेना, सीए स्वप्नील मुनोत, सीए प्रीतम माहुरे, सीएमए राजेश शुक्ला, ॲड. प्रकाश मोरे, सीए रामास्वामी लक्ष्मणन, सीएमए सुहास कुलकर्णी आदींनी मार्गदर्शन केले.
या चर्चासत्रात जीएसटी खटल्याची कायदेशीर चौकट समजून घेणे, न्यायालयीन उदाहरणे आणि महत्त्वाच्या प्रकरणांचे विश्लेषण, प्रभावी विवाद निराकरण आणि दावा व्यवस्थापनासाठी धोरणे, वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरण नेव्हिगेट करण्यासाठी व्यावहारिक अंतर्दृष्टी, खटल्यातील जोखीम कमी करण्याची सर्वोत्तम पद्धत आदी मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी कुलकर्णी, धनश्री रेड्डी आणि सार्थक कुलकर्णी यांनी केले.