पुणे -महापालिका भवनावरील “पुणे महानगरपालिका’ हा “निऑन साइन’ बोर्ड शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने तुटला. सुमारे 31 वर्षांपूर्वी हा बोर्ड महापालिका भवनावर लावण्यात आला होता. जो चहूबाजूने पुणेकरांना दिसत होता आणि या वास्तूची शान वाढवत होता.
शुक्रवारी मुसळधार पावसामुळे आणि त्या आधी आलेल्या वादळीवाऱ्यांमुळे हा साइन बोर्ड तुटला. लॉकडाऊन असल्यामुळे फारशी वर्दळ येथे नाहीच शिवाय महाराष्ट्र दिन असल्याने महापालिकेला सुटीही होती. त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही.
हा बोर्ड दि.1 जानेवारी सन 1989 मध्ये बसवण्यात आला होता. या बोर्डाचा इतिहास आणि आठवण त्यावेळचे महापौर अंकुश काकडे यांनी सांगितली. या इमारतीवर “निऑन साइन बोर्ड’ बसवण्याचा ठराव पक्षनेत्यांपुढे आला. मात्र, त्यावेळी वेगवेगळ्या आदर्श पुरुषांची नावे सुचवायला आणि त्याप्रमाणे दबाव टाकण्याला सुरूवात झाली. मात्र, असा कोणताही “कम्युनिटी’ रंग देण्यापेक्षा “पुणे महानगरपालिका भवन’ असे नाव द्यावे, असा मानस मी व्यक्त केला, असे काकडे म्हणाले.
त्यानंतर “प्रभात निऑन साइन’ यांच्याशी बोलणे झाले आणि त्यांनी त्यावेळी तो बनवून तेथे लावण्याची तयारी दर्शवली. त्याची निविदा काढली नाही, म्हणून त्यावेळी ओरड झाली, मात्र नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी हे नाव महापालिका भवनावर दिसावे अशी इच्छा असल्याने 31 डिसेंबर 1988 च्या 12 वाजता आणि 1989 सालाच्या आगमनाप्रित्यर्थ विद्युत बटण दाबून याचे आपण स्वत: उद्घाटन केले. याक्षणी त्यावेळचे नगरसेवक शांतिलाल सुरतवाला, आताचे खासदार आणि त्यावेळचे नगरसेवक गिरीश बापट, धनंजय थोरात आदी उपस्थित होते, अशी आठवणही काकडे यांनी सांगितले. या घटनेला 31 वर्षे चार महिने झाले आहेत.
आताच्या महापालिकेच्या कामाच्या दर्जाच्या मानाने हा बोर्ड तसा बराच वर्षे टिकला, अशी कोपरखळी काकडे यांनी मारली. त्यावेळी अतिशय प्रतिष्ठेने हा बोर्ड लावला होता. त्याची आठवणही अनोखी होती म्हणूनच “आशा पब्लिसिटी प्रायव्हेट लिमिटेड’च्या चंद्रकांत कुडाळ यांना विनंती केली. त्यानंतर त्यांनी नवा बोर्ड “मोफत’ करून देण्याची तयारी दर्शवल्याचे काकडे यांनी सांगितले.