पिंपरी, (प्रतिनिधी) – भारत निवडणूक आयोगाच्या नियमांचे आणि मार्गदर्शक सुचनांचे तंतोतत पालन करण्यासाठी निवडणूक यंत्रणा काम करत असते. ही सर्व प्रक्रिया निष्पक्ष, मुक्त तसेच पारदर्शक वातावरणात पार पाडली जावी यासाठी सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका अत्यंत जबाबदारीची आणि महत्वाची असते. त्यामुळे सूक्ष्म निरीक्षकांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर यांनी दिले.
चिंचवड येथील ऑटोक्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे मावळ लोकसभा मतदारसंघातंर्गत सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण सत्र आज पार पडले. या प्रशिक्षण सत्रात मार्गदर्शन करताना निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर बोलत होते.
यावेळी पुणे जिल्ह्याचे सहाय्यक प्रशिक्षण समन्वय अधिकारी तथा पुणे महानगरपालिकेचे उपआयुक्त राजू नंदकर, मावळ लोकसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे समन्वय अधिकारी प्रवीण ठाकरे, हिम्मत खराडे, निवडणूक सहाय्यक अभिजीत जगताप, निरीक्षक समन्वयक प्रमोद ओंभासे, संबंधित अधिकारी आणि पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नियुक्त सूक्ष्म निरीक्षक उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यात सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका जबाबदारीची आणि महत्वाची असते. त्यामुळे सूक्ष्म निरीक्षकांनी जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर यांनी दिले.
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी एकूण ८३ सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणूकीच्या दिवशी संवेदनशील मतदान केंद्रावर तसेच गृह मतदानासाठी या सूक्ष्म निरीक्षकांकडे महत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याबाबतचे सविस्तर प्रशिक्षण सहाय्यक प्रशिक्षण समन्वयक अधिकारी राजू नंदकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे दिले.