वडगाव मावळ, {किशाेर ढोरे} – मावळ लोकसभा निवडणुकीसाठी येत्या सोमवारी (दि. ७) होणाऱ्या मतदानाकरिता राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आपल्याच पक्षाला अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी बूथ कमिट्यांना प्रथम महत्त्व दिले आहे. मतदान अवघ्या चार दिवसांवर आले असल्याने बूथ कमिट्यांना घेऊन नेते आणि पदाधिकारी मंथन करीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
गावातील प्रत्येक मतदारांना मतदान चिट्ठयांचे वाटप करणे, त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानासाठी घराबाहेर काढणे, वृद्ध, दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यात गावपातळीवर बूथ कमिट्यांची भूमिका ही महत्त्वपूर्ण असते. तेव्हा राजकीय पक्षांच्या नजरा बूथ कमिट्यांच्या कामावर आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे.
त्यासाठी गावागावांत बूथ कमिटीच्या सदस्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. त्यांना साहित्याचे सुद्धा वाटप केले जात आहे. उमेदवारासह वरिष्ठ नेते एकाही बूथवर कमी मताधिक्य मिळायला नको, याची काळजी घेण्याच्या सूचना करीत आहेत. त्यामुळे बूथ कमिट्यांना विशेष महत्त्व आल्याचे चित्र होते. मतदानाच्यावेळी पहाटेपासूनच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बूथवर रेलचेल राहणार आहे. आलेल्या मतदारांना मार्गदर्शन करण्याचेही कार्य ते करणार आहेत.
वाड्या-वस्त्यांवर राहणारे मतदार घरातील सर्व कामे आटोपल्यानंतरच घराबाहेर पडतात, हा आजवरचा अनुभव आहे. मात्र सध्या कडक उन्हाळा असल्याने ते पायी मतदानाला जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे गाव पातळीवरच अशा मतदारांना मतदानासाठी नेण्याकरिता वाहनाची सोय राजकीय पक्षांकडून होण्याची शक्यता आहे. सध्या राजकीय पक्षांकडून मतदानाच्या स्लीप वाटण्याचे काम सुरू आहे. या कामावर विरोधकांची करडी नजर आहे. वाटप करणारे केवळ स्लीपच वाटतात की त्यासोबत पैसे वाटतात, याचा शोध घेत आहेत.
इतर मतदार संघात प्रचार
दरम्यान मावळ तालुक्यातील काही पक्षांचे पदाधिकारी बारामती लोकसभेच्या प्रचाराकरिता मुळशी आणि भोर तालुक्यात गेले आहेत. त्यामुळे उर्वरित दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांच्या खांद्यावर सध्या प्रचाराची धुरा आहे. मात्र ७ मे नंतर हे कार्यकर्ते तालुक्यात प्रचारासाठी सक्रिय होणार की आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी शिरूर मतदार संघात जाणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
पारावरच्या गप्पा जोरात
महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (दि. ७) पार पडले. आत्तापर्यंत कोणत्या पक्षाची सरशी झाली. बाजूच्या बारामती लोकसभा मतदार संघातून कोण निवडून येणार, याची केवळ चर्चाच नाही तर याबाबत पैजाही लागल्या आहेत. तसेच आपल्या मतदार संघात कोणी कोणाला पाठींबा दिला अन् राजकी गणिते कशी फिरली, याबाबतही साधकबाधक चर्चा गावच्या पारावर होत आहे.