तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – निवडणूक आयोगाने केलेल्या मागणीनुसार मावळ लोकसभा मतदानाच्यावेळी तळेगाव दाभाडे एसटी आगारातून मावळ लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी ४९ बस देण्यात येणार असल्याची माहिती तळेगाव दाभाडे येथील आगार व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे यांनी दिली.
येत्या १३ मे रोजी मावळ लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. या मतदानासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या मागणीनुसार तळेगाव दाभाडे एसटीआगारातून २५ बस आणि इतर एसटी आगारातून मागविलेल्या २४ अशा एकूण ४९ बस रविवारी (ता.१२) आणि सोमवार (ता. १३) या दोन दिवसांसाठी देण्यात येणार आहेत.
या बसेसकरिता विशेष बससेवा प्रासंगिक कराराच्या नियमानुसार आकारण्यात आलेल्या दराने देण्यात आलेल्या आहेत. बसमधून निवडणुकीचे काम करणारे कर्मचारी, तसेच ईव्हीएम मशिन, आदी निवडणूक साहित्य वाहतूक करण्यात येणार आहे. तसेच एखादी बस बंद पडल्यास त्यास पर्यायी बसही त्वरीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.