नागपूर – हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक चर्चेच्या केंद्रस्थानी राहिल्यानंतर आज दुसरा दिवस सुद्धा मलिक यांच्या भूमिकेवरून अजित पवार गटाला कोंडीत धरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मलिक यांनी आज सुद्धा अधिवेशनाला हजेरी लावत काल बसलेल्या ठिकाणी जाऊन बसले. त्यामुळे अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांची बाजू सांभाळून घेत बचावात्मक पवित्रा घेतल्याचे दिसून आले.
देवेंद्र फडणवीस यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहित नवाब मलिक यांना महायुती सरकारमध्ये सामील करून घेऊ नये, असे म्हटले होते. यानंतर अजित पवार गट कोणती भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते.
यावर अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बोलताना नवाब मलिक यांनी आपली कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे आम्ही नवाब मलिकांच्या बाबतीत भूमिका घेणे अयोग्य असल्याचे फडणवीस यांच्या कानावर घातले. त्याचबरोबर आमदार म्हणून त्यांना सभागृहात बसण्याचा अधिकार असल्याचे सुद्धा पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमच्या गटाने महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्याबाबत नवाब मलिक यांना कोणतीही माहिती नव्हती. हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने ते पहिल्यांदाच सभागृहात आले होते. मात्र, ते कोणत्या गटासोबत आहेत, याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी माझे मत देईन.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री
नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे आहेत. त्यांची साथ महायुतीत नको ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. नवाब मलिक चालत नाहीत, मग कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्चीशी संबंधीत प्रफुल्ल पटेल फडणवीस यांना कसे चालतात? फडणवीस यांचे देशप्रेम नकली आहे. अशा नकली देशप्रेमाची नौटंकी महाराष्ट्रात चालणार नाही.
– नाना पटोले, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष
प्रफुल्ल पटेलांवर भाजपचे मौन
नवाब मलिकांविरोधात भाजप आणि शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली असली, तरी प्रफुल्ल पटेलांवर भाजपने मौन बाळगणे पसंत केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवल्यानंतर कोणतीच प्रतिक्रिया दिली. भाजप नेते आशिष शेलार यांनीही प्रफुल्ल पटेलांवरील आरोपावर उत्तर दिले नाही. भाजप प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकरण वेगळे असल्याचे सांगत पटेलांवर थेट प्रतिक्रिया देण्याचे टाळले.