मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तसेच नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गंभीर आरोपदेखील केला. तसेच दिवाळीनंतर आपण बॉम्ब फोडणार असल्याचा असा सूचक इशारा फडणवीस यांनी दिला. यावर नवाब मलिक यांनी फक्त ३ शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणत आहेत. मात्र दिवाळीनंतर आपण मोठा बॉम्ब फोडणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, त्यांच्या या सूचक इशाऱ्यावर आता मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यासाठी त्यांनी केवळ ३ शब्दांचे ट्विट केले आहे. त्यात त्यांनी “है तैयार हम” असे म्हटले आहे.
है तैयार हम @Dev_Fadnavis
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 1, 2021
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर देताना म्हटले, “जो फोटो त्यांनी ट्विट केला आहे तो चार वर्षांपूर्वीचा आहे. रिव्हर मार्चच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केल्यानंतर आम्ही त्या मोहिमेशी जोडले गेलो होतो. मी त्यांना मदत करत होतो. त्या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी हे फोटो काढण्यात आले आहेत. नवाब मलिकांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला याच्या पाठीमागची मानसिकता दिसत आहे. रिव्हर मार्चने स्पष्ट केले आहे की तो भाड्यानं आणलेला माणूस आहे. त्यामुळे त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही.”
“भाजापाचे ड्रग्ज कनेक्शन आहे असे मलिक म्हणाले तर त्यांचे जावई ड्रग्जसोबत सापडले आहेत. नवाब मलिकांच्या म्हणण्यानुसार अख्खी एनसीबी ही ड्रग्ज माफिया व्हायला पाहिजे. कारण संबंध नसलेल्या व्यक्तीसोबत फोटो आल्याने जर कोणी माफिया होत असेल तर ज्यांच्या घरी ड्रग्ज सापडतात त्यांचा पक्ष काय होणार आहे? नवाब मलिकांनी लवंगी फटाका लावलाय आता त्यांनी लक्षात ठेवावे दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडणार आहे.