बुलढाणा – दिवाळी सणाच्या तोंडावर कुटुंबीयांवर संकट आले आहे. घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये परिवारातील चार जण जखमी झाले आहेत. या स्फोटात घराचे छप्पर उडाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना बुलढाणा जिल्यातील संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा येथे घडली आहे.
रविवार रोजी रात्री अचानक गॅसचा स्फोट झाला असून यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ अकोला येथे हलविण्यात आले आहे. श्रीकृष्ण उगले, गोपाळ उगले, रवी इप्परकर व राहुल इप्परकर असे स्फोटात जखमी झालेल्या चौघांची नावे आहेत.
देशभरात दिवाळी सण मोठ्या उत्हासात साजरा करण्यात येत आहे. मात्र या परिवारावर ऐन दिवाळीत मोठे संकट आले आहे. एकीकडे कुटुंबातील सदस्य जखमी झाले आहेत तर दुसरीकडे घराचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे दुहेरी संकटात हे कुटुंबं सापडले आहे.