बीड : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. पक्ष बांधणीसाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यभरात सभा घेण्याचे सत्र सुरु केले आहे. त्यांच्या पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता अजित पवार यांची आज होणारी राज्यातली राष्ट्रवादीची पहिलीच सार्वजनिक सभा आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या सभेची जोरदार तयारी केली असून मोठी गर्दी जमेल असेही नियोजन केले आहे.
बीडमध्ये सभेसाठी मोठा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अण्णा भाऊ साठे पुतळा, जालना रोड, बार्शी रोड व नगर रोडवर जागोजागी स्वागत बॅनर, भव्य कटआउट्स तसेच स्वागत कमानी उभारल्या आहेत. सभेला लोकांसाठी अनेक ठिकाणांहून परिवहन महामंडळाच्या बसही लावल्या आहेत.
सभा यशस्वी व्हावी, यासाठी धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील अमरसिंह पंडित, आमदार प्रकाश सोळंके, आमदार बाळासाहेब आजबे, राजकिशोर मोदी, जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, बबन गवते, डॉ. योगेश क्षीरसागर आदींसह जिल्ह्यातील इतर नेत्यांवर आपापल्या भागांचा भार सोपविला आहे. सभास्थळी महिलांसाठी देखील स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आल्याची माहिती, जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण यांनी दिली.
छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल येथे होणाऱ्या सभेला अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री धनंजय मुंडे, आदींसह राष्ट्रवादीचे इतर आमदारही उपस्थित राहणार आहेत.