मुंबई – मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून अर्थात 27 ऑगस्ट ते गणेशोत्सव संपेपर्यंत (28 सप्टेंबर) अवजड वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही घोषणा केली आहे. आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खड्डे मुक्त करण्यासाठी सध्या मुंबई गोवा महामार्गावर जलद गतीने काम सुरू असल्याने जड वाहतूक बंद केली आहे. यासाठी वाहन चालकांनी पर्यायी महामार्गाचा वापर करावा असं आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या 12 वर्षांपासून रखडले आहे. मनसेने मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर प्रशासन कामाला लागले असून गणेशोत्सवापूर्वी एक लेनच काम पूर्ण करण्यासाठी सरकारने जोरदार तयारी केली आहे. तर डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण महामार्गाचं काम पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. त्यानुसार सध्या या महामार्गावर काम केले जात असून अवजड वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा समोर येतो. मात्र अनेक आंदोलने, पाहणी दौरे झाल्यानंतरही महामार्गाची अवस्था जैसे थेच राहते. सामान्य नागरिकांना देखील या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे आता मनसेने लक्ष वेधले असून 12 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करावं, यासाठी मनसेच्या जागर यात्रेला सुरुवात झाली आहे.
पळस्पे फाटा येथून अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेला सुरुवात झाली असून संपूर्ण कोकणात एकूण आठ टप्प्यात पदयात्रा निघणार असून प्रत्येक टप्प्यात 15 किलोमीटरची पदयात्रा असणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता कोलाड नाका येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.