चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकांना संघर्ष करावा लागतो. यातील बहुतेकांची ही धारणा असते की आपल्याकडे सिनेसृष्टीतील कुटुंबाची पार्श्वभूमी नाही; अन्यथा इथला प्रवेश सुकर झाला असता! काही अंशी ते खरे असले तरी कित्येक स्टार किडस् याला अपवादही आहेत. बोनी कपूरचा मुलगा अर्जुन कपूर याने अलीकडेच याबाबत खुलासा केला आहे.
अर्जुन सांगतो की, मी फिल्म इंडस्ट्रीमध्येच लहानाचा मोठा झालो. त्यामुळे मी आजवर अनेक चढउतार माझ्या आईवडिलांच्या माध्यमातून पाहिले आहेत. स्टारकिड असला तरीही तुम्ही सदैव चांगल्या आणि वाईटासाठी तयार असावेच लागते. माझ्याबाबत सांगायचे तर, मी माझ्या वडिलांकरवी आदित्य चोप्राला भेटण्यास सांगू शकलो असतो.
पण मला जो योग्य रस्ता वाटला तोच मी निवडला. मी कास्टिंग दिग्दर्शकांना भेटलो आणि ऑडिशन दिली. आदित्य चोप्राने मला तीन ते चार वेळा रिजेक्टही केले. पण नंतर त्यांनी माझे फोटो पाहून तुला नायक म्हणून एक व्यक्तिरेखा माझ्याकडे आहे असे सांगितले. त्यानंतर मी इश्कजादेसाठी ऑडिशन दिली आणि मला तो चित्रपट मिळाला.