प्लॅनिंग नाही! बी-टाऊनमधील कलाकारांना विविध कार्यक्रमांमधून अत्यंत खासगीतील खासगी प्रश्नही विचारले जातात. कित्येक कलाकार हे स्पोर्टिंगली घेतात आणि त्याची तितक्याच सहजतेने, हसतखेळत उत्तरे देतात. कित्येकदा यामध्ये कुणी तरी पसरवलेल्या अफवांवर आधारित प्रश्नांचाही समावेश असतो.
किंबहुना, हल्ली तर या कलाकारांचा बराचसा काळ अफवांचे खंडन करण्यातच जात असतो. करीना कपूरचेच उदाहरण घ्या ना ! सैफ अली खानसोबत विवाहबद्ध झाल्यानंतर करीना मुख्य प्रवाहापासून काहीशी लांब गेली असली तरी बॉलीवूडला तिच्या खासगी आयुष्यात आजही रस आहेच! त्यामुळेच की काय मध्यंतरी सैफीना लवकरच आणखी एक चान्स घेणार असल्याची चर्चा रंगली होती. सैफ आणि करीना यासाठी प्लॅनिंग करत असल्याचे बोलले जात होते.
पण अखेर करीनाने या अफवा खोडून काढत आम्ही सध्या तरी एका मुलावर समाधानी आहोत असे सांगत कुटुंबविस्ताराच्या चर्चांना पूर्ण विराम दिला.
सध्या करीना गुड न्यूज या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या दरम्यान तिला सातत्याने याविषयीच्या बातम्या वाचायला-ऐकायला मिळत होत्या.
त्यामुळेच तिने अखेर माझ्याकडून मुलासंदर्भातील गुड न्यूज मिळणार नसून मी एका मुलावर प्रचंड आनंदी आहे, असे सांगितले आहे. तसेच सध्या मी आणि सैफ दोघेही कामात व्यस्त असून दोघेही वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ यांमध्ये संतुलन साधत आनंदाने जगत आहोत. उलट मी अधिकाधिक वेळ तैमूरला द्यावा, असे सैफला सतत वाटत असते. त्यामुळे दुसऱ्या मुलाच्या विचाराचा प्रश्नच येत नाही!